पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सणासुदीचे दिवस असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यास मदत करण्याच्या हेतुने दूध खरेदी दरात वाढ करणेचे केलेली सूचना मान्य करीत कात्रज दूध संघाने गाय दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार प्रति लिटरला ३४ रुपये दर होत असून बुधवारपासून (दि.२७) अंमलबजावणी होत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
गाय दूधाची (३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी) खरेदी दरात प्रति लिटरला एक रुपया वाढीमुळे २७ ऑगस्टपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ३४ रुपये आणि वरकड खर्चासह दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांसाठी हा दर प्रति लिटरला ३४ रुपये ८० पैसे राहील. तरी जिल्ह्यातील दूध उत्पादक व सर्व दूध संस्थांनी कात्रज दूध संघास स्वच्छ, ताज्या व भेसळविरहित उच्चतम गुणप्रतीच्या दूधाचा जास्तीत-जास्त पुरवठा करण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष ढमढेरे यांनी केले.