

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील मेटांगळे शिवारात शेतातील कामासाठी दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून दोघे खाली पडले. मात्र, महिलेच्या पाठीवर असलेल्या फवारणी पंपामुळे बिबट्याला थेट हल्ला करता न आल्याने मोठा अनर्थ टळला.
विद्या दत्तात्रय शिंदे व त्यांचे पती दत्तात्रय बाळाजी शिंदे हे शेतातील कामासाठी दुचाकीवरून जात होते. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झडप घेतली. त्यामुळे दत्तात्रय यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दोघेही रस्त्यावर पडले.
यावेळी विद्या शिंदे यांच्या पाठीवर फवारणी पंप अडकवलेला असल्याने बिबट्याचा हल्ला फसला. दुचाकीवरून पडल्याने विद्या शिंदे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपाल गणेश बागडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने परिसरात पिंजरा लावला आहे. यावेळी रेस्क्यू टीमचे संतोष कुतळ, रोहित बोडके व जयेश भोर उपस्थित होते.