

Pune Crime Khed Election Kidnapping
राजगुरुनगर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार प्रतिनिधी निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी एका संचालकाचे अपहरण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथील शिवकृपा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक रामदास महादू निमसे (वय ६०) यांचे रविवारी (दि. ६) अपहरण झाल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रविवारी (दि. १३) होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने खेड तालुक्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
या प्रकरणी अपहरण झालेल्या संचालकांचे सुपुत्र राहुल रामदास निमसे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ११:३० वाजता संशयितांनी त्यांच्या वडिलांना कान्हेवाडी बुद्रुक येथे बैठकीसाठी बोलावून घेतले होते; मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. संशयितांनी आमिष दाखवून त्यांना पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर, बुधवारी (दि. ९) मध्यरात्री १२:३० वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये बाजीराव नथू कोबल, ज्ञानेश्वर गंगाराम कोबल आणि धोंडीभाऊ गेनूभाऊ सहाने (सर्व रा. कान्हेवाडी) यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी निवडणुकीत बहुमत सिद्ध करण्यासाठीच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे तालुक्यातील गावोगावी राजकीय गटबाजी उफाळून आली असून, पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. पोलीस सध्या संशयितांची चौकशी करत असून बेपत्ता संचालक रामदास निमसे यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, या कारवाईबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.