Pune News : पुण्यात काल जलत्रयोदशी..!

Pune News : पुण्यात काल जलत्रयोदशी..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी अवकाळी पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यामुळे काही वेळातच रस्त्यावरून जोरदार पाणी वाहू लागले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे दिवाळी खरेदीसाठी शहरात आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. ग्राहकांची ऐन सणासुदीच्या दिवसांत पावसामुळे गर्दी कमी झाल्याने सर्वांत जास्त हाल झाले ते किरकोळ विक्रेत्यांचे. त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या साहित्याची अवस्था दयनीय झाली.

पावसामुळे येरवडा, धानोरी, धनकवडी, पाषाण या भागांत झाडपडीच्या काही घटना घडल्या. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून शहरात हवामान कोरडे राहणार आहे. पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढली होती. दुपारनंतर मात्र, अचानक शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात झाली.

शहरातील पर्वती, सहकारनगर, बिबवेवाडी, कात्रज, तसेच शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की, काही वेळातच रस्त्यावरून पाणी वाहू लागले. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

दुकानामधून खरेदी करण्याऐवजी नागरिकांनी माघारी फिरणे पसंत केले. ग्राहकांअभावी दुकानदारांचा हिरमोड झाला. किरकोळ विक्रेत्यांचे चांगलेच हाल झाले. रस्त्यावर दिवाळीचे साहित्य विक्रीस बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या मालाचेदेखील काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे दिसून आले. (पान 1 वरून) दरम्यान, अचानक पडलेल्या पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली. विशेषत: लक्ष्मी रोड, मंडई, बाजीराव रोड, कुमठेकर रोड या भागात वाहतुकीची कोंडी झाली.
इंदिरानगर चौकात साचले पाणी

बिबवेवाडी

बिबवेवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अप्पर, इंदिरानगर, के. के. मार्केट, बिबवेवाडी गावठाण परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. इंदिरानगर चौकात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र दिसून आले. काही पथारी व्यावसायिकांचे साहित्य पावसाच्या पाण्यात वाहून गेले. के. के. मार्केटजवळील मूर्ती विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. दिवाळीच्या खरेदीसाठी सायंकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची या पावसामुळे चांगली धांदल उडाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news