

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात अभय योजनेचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच या कामाची व्याप्तीदेखील वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील हवेली 1 आणि 2 या कार्यालयातील दस्तनोंदणी 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याबरोबरच हवेली 21, 22 आणि 23 या दस्तनोंदणी कार्यालयातील कर्मचा-यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी ही माहिती दिली.
नोंदणी महानिरीक्षक सोनवणे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 या अंतर्गत 1980 ते 2000 या कालावधीतील नोंदणीसाठी दाखल झालेल्या दस्तामध्ये एक लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क थकबाकी असेल तर ते मुद्रांक शुल्क 100 टक्के माफ करण्यात आले आहे. मात्र दस्त दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अभय योजनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सह दुय्यम निबंधक वर्ग 2 च्या अंतर्गत असलेले दस्तनोंदणी कार्यालय क्रमांक 1 आणि 2 मध्ये नव्याने नोंदणी येणारे दस्त 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती शहर सह जिल्हा निबंधक वर्ग -1 संतोष हिंगाणे यांनी दिली.
हेही वाचा