Pune News : खोदाई प्रचंड, प्रदूषण उदंड!

Pune News : खोदाई प्रचंड, प्रदूषण उदंड!
Published on
Updated on

पुणे : शहरात जागोजागी विविध कामांसाठी खोदाईची कामे प्रचंड संख्येने सुरू असल्यानेच प्रदूषणही उदंड झाल्याची कबुली पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी खास 'पुढारी'ला दिली. शहरात वाहन दूषित वायू सोडत आहेतच; पण त्यात खोदकामांनी मोठी भर टाकल्याने शहराला प्रदूषणाचा ऑरेंज अलर्ट द्यावा लागला. पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता दिल्लीनंतर सर्वाधिक मोजली जात असल्याचे चिंताजनक चित्र आहे.

रविवारी सफर (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या संस्थेसह केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीबीसीपी) या दोन्ही जबाबदार संस्थांनी पुणे शहरातील आजवरच्या सर्वोच्च हवाप्रदूषणाची नोंद जाहीर केली.
सफरने शहराला हवाप्रदूषणाचा ऑरेंज अलर्ट (हवा खूप खराब) दिला. दिल्ली शहरातील हवाप्रदूषण 400 मायक्रो ग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतके नोंदविले गेले. दिल्लीपाठोपाठ पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता 301 इतकी नोंदवली गेली.

शहर झाले बंदिस्त खोली

'पुढारी'ने सफर संस्थेच्या शास्त्रज्ञांशी संपर्क केला. शहरातील हवाप्रदूषण इतके अचानक वाढण्याचे कारण का? या प्रश्नावर शास्त्रज्ञांनी पाठवलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शहरात वाहनप्रदूषण आहेच; शिवाय खोदकामे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शिवाय ढगाळ परिस्थितीने शहरातले वातावरण बंदिस्त खोलीसारखे झाले. त्यामुळे शहरावर प्रथमच स्मॉग तयार झाला. स्मॉग म्हणजे वाहनाच्या इंधन ज्वलातून निघणारे सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकण, खोदाईकामांमुळे तयार झालेली धूळ आणि हलके धुके यांचे मिश्रण. या मिश्रणाचा थर शहरात अनेक ठिकाणी दिसत होता.

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक तीनशे पार

आजवर चीनमध्ये जगात सर्वाधिक स्मॉग असल्याची रोज नोंद दिसत होती. आता चीनला दिल्लीने मागे टाकले. रविवारी दिल्ली जगात सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले. त्यानंतर पुणे शहर चर्चेत आले. कारण, पुणे शहराचा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 301 वर गेला होता. शिवाजीनगर 301, भूमकर चौक 301, स्वारगेट येथे 280 इतकी हवेची गुणवत्ता रविवारी पोहचली होती.

शहरात वाहन प्रदूषणासोबत विविध कारणांनी होणारी खोदकामे तसेच रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या कामांमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. धूर,धूळ आणि धुके यामुळे शहरावर स्मॉग तयार होत आहे. याला एकच उपाय आहे; तो म्हणजे आपण स्वतः प्रदूषण कमी करणे.

डॉ. बी. एस. मूर्ती, प्रकल्प संचालक, सफर संस्था

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news