

पुणे : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाच्या आधी पुण्यात मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
पुण्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा 'छात्रों की गूंज' हा कार्यक्रम आज (दि. २२, शनिवार) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी देशभरातील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत; मात्र त्यापूर्वीच काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद उफाळून आला. "एबीव्हीपीचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी येथील तरुणांना धमकावत राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा इशारा दिला," असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. या वादानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.
एआयएसएसएमएसच्या (AISSMS) मैदानावर राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. या कार्यक्रमाला ८ ते १० हजार तरुणांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रवेश व्यवस्था आणि महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी किमान चार प्रवेशद्वारे आणि स्वयंसेवकांची नियुक्ती बंधनकारक करण्यात आली आहे.
सर्व संबंधित विभागांकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात आक्षेपार्ह अथवा धार्मिक भावना दुखावणारा मजकूर आणि घोषणाबाजी टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विविध जिल्ह्यांतून महिला आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून राहुल गांधी त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.
"राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी प्रेक्षक मिळेनासे झाल्याने विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केली जात आहे. सीओईपीसारख्या नामांकित संस्थेच्या परिसरात काँग्रेस आणि एनएसयूआयच्या १००-१५० गुंडांनी घुसून विद्यार्थिनींना मारहाण केली. ज्या मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. 'छात्रों की गूंज'चा डंका पिटवणाऱ्या राहुल गांधींना या विद्यार्थ्यांचा आवाज ऐकू येत नाही का? की बहिरेपणाचे सोंग सुरू आहे? एका सर्वसामान्य अनाथ मुलीने काँग्रेसला उघडे पाडल्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विद्यार्थ्यांवर हात उचलाल तर जशास तसे उत्तर देऊ. काँग्रेस आणि राहुल गांधींना पळता भुई थोडी करू."
— अथर्व कुलकर्णी, प्रदेश मंत्री, एबीव्हीपी
"सीओईपीमध्ये दोन विद्यार्थिनींनी त्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नाबाबत आपली व्यथा मांडली होती. एखाद्या विद्यार्थ्याला आपला प्रश्न मांडताना दबाव किंवा भीती वाटत असेल, तर हा केवळ राजकीय मुद्दा नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांचा प्रश्न आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे; विद्यार्थ्यांना कोणत्याही पक्षाच्या राजकारणात ओढायचे नाही, उलट त्यांना निर्भयपणे आपला आवाज मांडता आला पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी. राहुल गांधी पुण्यात हजारो विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. त्या संवादापूर्वी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर खुली चर्चा झाली पाहिजे."
— अक्षय जैन, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (मीडिया विभाग)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना पांगवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिवाजीनगर, स्वारगेट, खडक, खडकी, बंडगार्डन आणि डेक्कन पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त कुमक मागवून घेतली; तसेच मुख्यालयातील दंगा नियंत्रण पथकांनाही तैनात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी १ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, यामध्ये ४०० महिला पोलिसांचा समावेश असणार आहे. याशिवाय, राखीव पोलिसांची पथकेसुद्धा बंदोबस्तासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.