Pune News : कळंब येथे बिबट्याचे कुटुंब फिरतेय बिनधास्त

Pune News : कळंब येथे बिबट्याचे कुटुंब फिरतेय बिनधास्त

मंचर : पुढारी वृत्तसेवा : कळंब (ता. आंबेगाव) येथील चांडोली रस्त्यावरील वीज उपकेंद्राजवळील वस्तीवर गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या नर-मादी आणि दोन पिलांचे दर्शन दिवसारात्री जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांना होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
वस्तीवर राहणारे भाजप युवा मोर्चाचे हेमंत चिखले यांना रस्त्याने जाताना बिबट्याची मादी पिलांसह द्राक्ष बागायतदार ग्रामपंचायत सदस्य केतन कहडणे यांच्या शेताच्या बांधावर बसलेली आढळून आली. अचानक बिबट्यांचे दर्शन झाल्याने त्याची घाबरगुंडी उडाली. या बिबट्याच्या नर-मादीला आणि तिच्या दोन पिलांना जेरबंद करावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, सरपंच उषा सचिन कानडे, अनिल कानडे यांनी केली आहे.

शेतकर्‍यांना दिवसा वीज द्या!

शेतकर्‍यांना शेती पिकांना पाणी भरण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत मांडली होती. अजून बिबट्याच्या भीतीने शेतकर्‍यांना किती दिवस असे जगावे लागणार आहे. बिबट्याचे भय अजूनही संपत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बिबट्याचे हल्ले मानवी वस्तीवर वाढतच आहेत. शेतकर्‍यांना रात्री शेतात पाणी भरताना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, या मागणीचा विचार लवकरात लवकर करावा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

अभियांत्रिकी विद्यालयाजवळील डोंगरावर बिबट्याचा वावर

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाजवळील मुधार्‍या डोंगरावर बिबट्याचा वावर असून, महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना बुधार्‍या डोंगरावर बिबट्याचे दर्शन झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना दुपारच्या सुमारास डोंगरावर बिबट्या मुक्त संचार करताना दिसला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकर्‍यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news