

पुणे: कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य, संगीत यांचा मनोहरी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे आणि उपाध्यक्ष घनश्याम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी (दि. 22 सप्टेंबर) सायंकाळी 4.30 वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Latest Pune News)
या उद्घाटन सोहळ्यात सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शीतल अहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋजुता जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी असेल.
घटस्थापनेच्या दिवशी शिवदर्शन येथील श्री. लक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी 6.41 मि. या शुभमुहूर्तावर विधिवत घटस्थापना केली जाईल. या उद्घाटन सोहळ्यात ‘महर्षी पुरस्कार’ प्राप्त समाजसेवक गिरीश प्रभुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
तर श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सामजिक कार्यकर्त्या डॉ. मेघा पुरव-सामंत, बुलडाणा सहकारी बँकेचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे आणि लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. मयूर कर्डिले आणि डॉ. अरविंद खोमणे, यांनाही विशेष सन्मानित करणात येणार आहे.
या महोत्सवात सितार, व्हायोलिन, बासरी व तबला यांची जुगलबंदी असणारा ‘आनंद तरंग’ हा कार्यक्रम, ‘जागर शक्ती पिठांचा’ देवीचा गोंधळ, सिनेतारकांचा ‘जल्लोष’ हा नृत्याविष्कार, गाण्यांचा ‘नाइनटीज मेलडी’, ‘इश्क? सुफियाना’, ‘स्वर सामाज्ञीयाँ’, ‘मुझीकल मास्टर्स’ ‘एल.पी अँड आर. डी. 50’ कलाकारांसह ‘अस्मिता महाराष्ट्राची’, ‘लावणी महोत्सव’, ‘बेमिसाल रफी’, ‘सोलफुल किशोर कुमार’ असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
यंदा दुर्गोत्सवासाठी आम्ही अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार करत आहोत, सजावटीचे सध्या काम सुरू आहे, 22 सप्टेंबरला सजावटीचे उद्घाटन होईल. 28 सप्टेंबरपासून दुर्गोत्सवाला सुरुवात होईल. यंदा आम्ही या वर्षीपासून आम्ही दुर्गोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्ती तयार करत आहोत. मूर्ती कोलकात्याच्या मूर्तिकारांनी तयार केल्या आहेत. तसेच, दुर्गोत्सवात बंंगाली संस्कृती अन् परंपरेचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत. बंगाली कलाकार कलेचे सादरीकरण करणार आहेत, कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे
. - अनुप दत्ता, पुणे काली बारी मंदिर, खडकी-रेंजहिल्स
कोलकात्याहून आलेले मूर्तिकार वीस दिवसांपासून मूर्ती तयार करत आहेत. पश्चिम बंगालहून आणलेल्या मातीतून या मूर्ती तयार करण्यात येत आहेत. आता मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुण्यात ठिकठिकाणी साजऱ्या होणाऱ्या दुर्गोत्सवासाठी भोसलेनगर येथे मूर्ती तयार करण्यात येत आहेत, या मूर्ती त्या-त्या ठिकाणी उत्सवासाठी पाठविल्या जाणार आहेत. संस्थेच्या दुर्गोत्सवाला 27 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. काँग्रेस भवनमध्ये होणाऱ्या या उत्सवात वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
- अरुण चटोपाध्याय, बांगीय संस्कृती संसद