पुणे: तुळजाभवानी माता, दुर्गादेवी, देवी सरस्वती, रेणुकामाता, महालक्ष्मी माता, महिषासुरमर्दिनी अन् सप्तशृंगी देवी... अशा विविध रूपातील देवींच्या सुंदर आणि देखण्या मूर्ती लक्षवेधी ठरत असून, मंडळांकडून देवीच्या मोठ्या मूर्तींना तर घरगुती नवरात्रोत्सवासाठी छोट्या स्वरूपातील मूर्तींची मागणी होत आहे. नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरल्यामुळे मूर्ती खरेदीलाही सुरुवात झाली असून, मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांचे कामही पूर्ण झाले आहे.
पुण्यातील कुंभारवाडा असो वा नवी पेठ... आदी ठिकाणी काही मूर्तिकार मूर्तींच्या रंगकामात व्यग््रा आहेत, तर काही मूर्तिकारांनी विविध रूपातील मूर्ती साकारल्या असून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती मूर्तिकारांकडून तयार करण्यात आल्या आहेत. चतु:श्रृंगी देवी असो वा अंबामाता... अशा विविध रूपातील मूर्तींना प्रतिसाद मिळत आहे. (Latest Pune News)
नवरात्रोत्सवाला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सगळीकडे आनंदाची अन् चैतन्याची पालवी फुलली असून, नवरात्रोत्सवाची तयारीही ठिकठिकाणी सुरू झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी मूर्तिकारांकडून विविध रूपातील देवींच्या मूर्ती खरेदी केल्या जातात. यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या आणि छोट्या स्वरूपातील मूर्ती तयार केल्या आहेत. मूर्तिकारही मोठ्या उत्साहाने काम करत आहेत.
काही मूर्तिकारांची तिसरी पिढी, तर काहींची चौथी पिढी मूर्ती तयार करण्यात व्यग्र आहेत. गणेशोत्सवानंतर मूर्तिकारांकडून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झाले आणि हे काम आता पूर्णही झाले आहे. मंडळांकडून मूर्तींसाठी विचारणा होत आहेच. त्याशिवाय घरगुती नवरात्रोत्सवासाठीही मूर्तींचे बुकिंग झाले आहे.
पुण्यातील मूर्तिकारांकडे विविध जिल्ह्यांमधून मूर्तिकारांकडे मूर्तींसाठी विचारणा होत आहे. मूर्तिकारांनी आपल्या कलाकारीने, कौशल्याने आदिशक्तीची विविध रूपे उलगडणाऱ्या मूर्ती तयार केल्या आहेत. 1 ते 6 फुटापर्यंतच्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून, ठिकठिकाणी मूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
मूर्तिकार राजेश बेलसरे म्हणाले, गणेशोत्सवानंतर आम्ही विविध रूपातील देवींच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. मोठ्या स्वरूपातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुमारे 40 ते 50 मूर्ती तयार केल्या आहेत. घरगुती नवरात्रोत्सवासाठी छोट्या स्वरूपातील 30 ते 40 मूर्ती तयार केल्या असून, कुटुंबातील सर्वजण मिळून मूर्ती तयार करत आहेत.
सहकुटुंब लागले कामाला
शहरातील खडकी, बिबवेवाडी, डेक्कन परिसर, नवी पेठ, कॅम्प परिसर आदी विविध ठिकाणी मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापासून मूर्तिकारांनी देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले असून, या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांचे संपूर्ण कुटुंब कामाला लागले आहे. तर परराज्यातून पुण्यात आलेले मूर्तिकारही उत्साहाने काम करत आहेत. बंगाली दुर्गोत्सवासाठीही ठिकठिकाणी मूर्ती तयार करण्यात येत आहेत.