पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने गुरुवारी (दि.9) बजेटमध्ये पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी तरतूद केली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पाला चालना मिळण्याची आणि याचे काम वेगाने सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र रेल इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने 'पुणे-नाशिक सेमी हायस्पीड' प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाला नुकतीच महाराष्ट्र शासनानेदेखील मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील आराखडा 'महारेल'कडून तयार करण्यात आला असून, तीन ते साडेतीन वर्षांत याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे शहरातील 4 तालुक्यांमधून ही रेल्वे जाणार आहे. तसेच, 102 गावांमधून ही रेल्वे जात आहे. पुण्यातील 54 गावे या प्रकल्पात येत आहेत.

…ही आहेत वैशिष्ट्ये

  • 235 किलोमीटर अंतर
  • 18 बोगदे
  • 19 उड्डाणपूल
  • 20 स्थानके
  • विद्युतीकरण असलेला दुहेरी मार्ग
  • 6 कोच सुरुवातीला, नंतर 12 ते 16 कोच बसवणार
  • सुरुवातीला 200 किलोमीटर प्रतितास वेग, नंतर 250 पर्यंत वाढवू शकणार
  • 16 हजार 39 कोटींपर्यंत खर्च
  • पुणे-नाशिक प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत

…असे आहे नियोजन

  •  हवेली, खेड, आंबेगाव, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, नाशिक तालुक्यातून धावणार
  • चाकण, मंचर, नारायणगाव, एलिफंटा, संगमनेरला प्रमुख स्थानके
  • मालवाहतुकीसाठी लोडिंग, अनलोडिंग सुविधा
  • प्रकल्प 1200 दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन
  • हायस्पीड रेल्वेगाडीच्या मार्गावर एक्सप्रेस आणि मालगाड्यादेखील धावणार

शेतकर्‍यांना, स्थानिकांना काय होणार फायदे?

  • शेतकर्‍यांना शेजारील भागात आपली उत्पादने विकण्यासाठी मदत होईल. कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत पोहचण्याचा सोपा, वेगवान आणि स्वस्त पर्याय
  • प्रवासी व माल वाहतूक जलद आणि सुरक्षित होईल.
  • पार्सल व्हॅन सुविधेमुळे शेतकरी ताज्या भाज्या, फळे, फुले इत्यादी लवकरात लवकर मुख्य बाजारपेठेत पोहचवू शकेल.
  • प्रकल्प प्रभावित क्षेत्रात कृषी आधारित उत्पादन उद्योगजकांना फायदेशीर ठरणार. त्यांना सहजपणे मुख्य ग्राहकांशी जोडणे शक्य.
  • तरुणांना रोजगारासाठी पुणे व नाशिक येथे स्थलांतरित होण्याची गरज भासणार नाही. कमी वेळेत पुणे व नाशिक या दोन मोठ्या शहरांशी थेट संपर्क साधू शकतात.
  • मुंबई, पुणे व देशातील इतर प्रमुख शहरांच्या बाजारपेठांना जोडणे व उत्पादनांची चांगल्या बाजारभावाने विक्री शक्य
  • ही रेल्वे लाईन पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट संपर्क साधेल. तसेच कृषी व इतर मालवाहू उत्पादने इतर देशांमध्ये निर्यात करण्यासाठी कार्गो टर्मिनलद्वारे पाठविले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news