मंचर: पुणे-नाशिक रेल्वे हा विषय गेल्या कित्येक दशकांपासून चर्चेत आहे. नागरिकांसाठी तो अद्यापही ‘स्वप्न’ ठरला आहे. हा प्रकल्प नेमका केव्हा पूर्ण होईल, रेल्वे प्रत्यक्षात धावणार की नाही? असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. याबाबत अजूनही शासनाची ठोस भूमिका दिसून येत नाही. त्यामुळे पुणे -नाशिक रेल्वे स्वप्न की वास्तव? याबाबत सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे.
रविवारी (दि. 21) सकाळी साधारण साडेअकराच्या दरम्यान पुण्याकडून नाशिककडे जात असलेल्या कंटेनरवर रेल्वेची बोगी दिसला. हे दृश्य अमर कानडे यांनी मोबाईलमध्ये कैद केले. काही वेळातच हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. (Latest Pune News)
परिणामी, नागरिकांमध्ये ’पुणे-नाशिक रेल्वे धावणार का?’ या चर्चेला पुन्हा उधाण आले. यामुळे नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी अजूनही प्रशासनाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे संभम कायम आहे.
प्रत्यक्षात पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प आर्थिक आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा पुढे ढकलला गेला आहे. तरीही वेळोवेळी अशा छायाचित्रांमुळे लोकांमध्ये रेल्वेबाबत उत्सुकता वाढते. याआधीही एकलहरे परिसरात आयुब शेख व आकाश कानडे यांनी कंटेनरवरून जात असलेल्या रेल्वेच्या बोगीचे छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल केले होते.
त्यावेळी देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.आजही नागरिकांच्या मनात एकच प्रश्न कायम आहे. पुणे-नाशिक रेल्वे धावणार की नाही? आणि या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत हा प्रकल्प लोकांसाठी गूढच राहणार आहे.