पिरंगुट: मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे ओढ्यावरील पुलाचे काम चालू आहे. त्या ठिकाणी ठेकेदाराच्या चुकीच्या आणि मनमानी कारभारामुळे रविवारी (दि. 21) सर्वसामान्य मुळशीकरांसह कोकणातील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला रविवारी काम करायचे नाही, असे बजावलेले आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत ठेकेदाराने नेमके रविवारच्या दिवशी सकाळीच पिरंगुट येथील ओढ्यावरील पुलावर पोकलेन घेऊन काम सुरू केले. त्यामुळे दोन्हीही बाजूला वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. (Latest Pune News)
पिरंगुटच्या बाजूला लवळे फाट्यापर्यंत, तर पौडच्या बाजूला घोटावडे फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कामाबाबत ठेकेदाराने पोलिसांनाही माहिती दिली नव्हती. त्याच्या या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांसह स्थानिकांना सहन करावा लागला. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता.
सर्वपित्री अमावास्या तसेच बैलपोळा असल्यामुळे पुण्यातील मुळशीकर गावाकडे येत होते. ते पिरंगुटमध्ये वाहतूक कोंडीत अडकले तसेच पावसाची उघडीप आणि रविवार असल्यामुळे मुळशीमध्ये पर्यटकांचीही संख्या वाढली होती.
त्यातच रविवार हा पिरंगुट येथील बाजाराचा दिवस असल्यामुळे गर्दीत मोठी भर पडली. या वाहतूक कोंडीमुळे सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. यापुढे अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने ठेकेदारांनी मनमानी कारभार केला आणि वाहतूक कोंडी होण्यास कारणीभूत ठरला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुळशी तालुका शरद पवार गटाचे अध्यक्ष महादेव कोंढरे, तसेच मुळशी बाजार समितीचे माजी उपसभापती दगडू करंजावणे यांनी केली आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष
पिरंगुट, भूगाव ही दोन्हीही गावे आता पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. त्यामुळे बावधनच्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी घोटवडे फाटा, पिरंगुट आणि भूगाव येथे उपस्थित असणे गरजेचे होते. मात्र, रविवारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकही पोलिस उपस्थित नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.