

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अतिसंवेदनशील व अतिज्वलनशील वायूचा टँकर पलटी झाल्याने संपूर्ण महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याचा फटका वाहनचालक व प्रवाशांना बसला, हे मान्य करत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाकडून काही प्रमाणात त्रुटी राहिल्याची कबुली दिली. मात्र, अपघातग््रास्त टँकरमध्ये असलेल्या वायूमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष दक्षता घेणे अपरिहार्य होते, असे त्यांनी सांगितले. या घटनेचा अभ्यास करून भविष्यातील असे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासन रायगड प्रशासनाच्या मदतीने उपाययोजना करेल असेही त्यांनी सांगितले.
शहरात पंधरा दिवसांपूर्वी ’पुणे ग््राँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेसाठी महापालिका हद्दीसह स्पर्धा मार्गावरील रस्ते नव्याने विकसित केले होते. स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय निकषांनुसार हे रस्ते तयार केले असून, भविष्यात या रस्त्यांवर पुन्हा खोदाई होऊ नये तसेच याच धर्तीवर इतर रस्त्यांचेही काम व्हावे, यासाठी निर्णय घेण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह महावितरण, बीएसएनएल आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीबाबत जिल्हाधिकारी डुडी यांना प्रश्न विचारण्यात आला.
डुडी यांनी सांगितले की, द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातामुळे नागरिकांना व वाहनचालकांची गैरसोय झाली. अपघातग््रास्त टँकरमध्ये अतिज्वलनशील पदार्थ असल्याने अत्यंत काळजीपूर्वकच टँकर बाजूला करण्याचे काम सुरू होते. या प्रक्रियेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
भविष्यात अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतली जाणार असल्याचे डुडी यांनी स्पष्ट केले. तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांतून येणाऱ्या टँकरच्या चालकांकडून अनेकदा आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुढील काळात टँकर चालकांचे विशेष प्रशिक्षण घेतले जाणार असून, टँकर किती वेगाने चालवावा, सुरक्षिततेचे कोणते नियम पाळावेत याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
तरीही दुर्दैवाने अशा घटना घडल्यास नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग तत्काळ उपलब्ध करून देण्यास जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
यापूर्वीही द्रुतगती महामार्गावर टँकर पलटी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, त्या वेळी कमी वेळेत अपघातग््रास्त वाहन बाजूला काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले होते. दोन दिवसांपूर्वी लोणावळा परिसरातही असा प्रकार घडला होता. त्या टँकरमध्येही अतिज्वलनशील वायू असल्याने गळती थांबविणे हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. टँकर चालकांचे प्रशिक्षण, सुरक्षित वेगमर्यादा यांचा अभ्यास सुरू आहे. भविष्यात अशा घटना घडल्यास वाहन चालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे.