

Civic body inspection Pune
पुणे: महापालिकेच्या विविध खात्यांद्वारे दर वर्षी 5 लाखांहून अधिक रकमेची विकासकामे (दुरुस्ती आणि देखभाल कामे वगळून) केली जातात. या कामांची गुणवत्ता भारत सरकारच्या इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणे बंधनकारक आहे. मात्र, काही खात्यांकडून ही प्रक्रिया टाळली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आयुक्त नवलकिशोर राम यांनी कडक पावले उचलली आहेत.
आयुक्तांनी सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्तांना त्यांच्या अखत्यारीतील सर्व क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळे आणि मुख्य खात्यांतर्गत होणार्या 10 टक्के कामांची प्रत्यक्ष तपासणी दक्षता विभागामार्फत करून घेण्यात यावी आणि त्या तपासणीचा अहवाल मुख्यालयाकडे पाठवावा, असे आदेश दिले आहेत. (Latest Pune News)
आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कामांची ईईएलमार्फतच गुणवत्ता तपासणी करणे बंधनकारक असून, अन्य कोणत्याही संस्थेमार्फत तपासणी केल्यास किंवा तपासणीविना निविदा प्रक्रिया पुढे रेटल्यास ती गंभीर शिस्तभंगाची बाब मानली जाणार आहे. अशा अनियमिततेस जबाबदार असणार्या कनिष्ठ, उपकार्यकारी अभियंता आणि खातेप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील परिपत्रकात देण्यात आला आहे.
शहरात ठेकेदारांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांबाबत नागरिकांकडून सातत्याने निकृष्ट दर्जा, अपूर्णता आणि वेळेच्या विलंबाच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे यापुढे कामे निकषांनुसार, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने ही कडक कार्यपद्धती लागू केली आहे. तसेच, अपवादात्मक परिस्थितीत ईआईएलमार्फत तपासणी करणे शक्य नसेल, तर संबंधित खात्याने अगोदरच अतिरिक्त महापालिका आयुक्तांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक आहे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेकडून शहरात विविध विकासकामे केली जातात. ठेकेदारांकडून कामे करून घेत असताना कामाचा दर्जा राखला जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. यामुळे अनेकदा महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या टीकेचा सामना करावा लागतो.
मनपाच्या विविध विभागांमार्फत विकसित होणार्या विकासकामांची मे. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (ईआईएल) या त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक गुणवत्ता तपासणी करून घेण्याचे सरकारचे आदेश आहेत. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळे व मुख्य खाते अंतर्गत दर वर्षी रक्कम 5 लाखांवरील होणार्या विविध विकासकामांकरिता मार्च 2027 अखेरपर्यंत कामांची गुणवत्ता तपासणी ईआईएल यांच्या कडून करून घेणे बंधनकारक राहणार आहे.