

निनाद देशमुख
पुणे: पुणे महापालिकेची रणधुमाळी चांगलीच तापली असून, अंतिम टप्प्यात प्रचाराने आता वेग घेतला आहे. जाहीर सभा, रोड शो, कोपरा सभा, सोशल मीडियावरील प्रचार, अशा सर्वच माध्यमांतून उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. सर्वच पक्षांकडून ‘नवे चेहरे’, ‘तरुण नेतृत्व’, ‘बदलाची संधी’ अशा घोषणा दिल्या जात असल्या; तरी प्रत्यक्ष उमेदवारी यादी पाहिली की, या दाव्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. कारण ‘चेहरे नवे’ असले, तरी ‘घराणी’ मात्र जुनीच असल्याचे चित्र या निवडणुकीत ठळकपणे समोर आले आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजप, काँग््रेास, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना (दोन्ही गट) आणि मनसे या सर्वच पक्षांनी मोठ्या प्रमाणावर नव्या उमेदवारांना संधी दिल्याचा दावा केला आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापून तरुणांना, महिला उमेदवारांना आणि तथाकथित ‘फेश’ चेहऱ्यांना पुढे करण्यात आले आहे. मात्र, या नव्या चेहऱ्यांची पार्श्वभूमी पाहिली असता राजकीयदृष्ट्या ते पूर्णपणे नवे नसल्याचे स्पष्ट होते. बहुसंख्य उमेदवार हे विद्यमान किंवा माजी नगरसेवक, आमदार, खासदार, पक्ष पदाधिकारी किंवा प्रभावशाली नेत्यांचे नातेवाईक आहेत. कुणी माजी नगरसेवकाचा मुलगा आहे, तर कुणी विद्यमान नगरसेविकेची पत्नी. कुठे भाऊ-बहीण, तर कुठे पती-पत्नी किंवा सासू-सून अशा नातेसंबंधांतूनच उमेदवारी दिल्याचे दिसते. त्यामुळे ‘नवे चेहरे’ हा फक्त चेहऱ्यांचा बदल आहे की खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा बदल? असा सवाल उपस्थित होत आहे.
पक्षांची कोंडी आणि तडजोडीचे राजकारण
घराणेशाही वाढण्यामागे पक्षांची अंतर्गत कोंडी आणि निवडणूक जिंकण्याची धडपड हे प्रमुख कारण मानले जात आहे. ‘ओळखीचे नाव’, ‘मतांचे समीकरण’, ‘स्थानिक प्रभाव’ या निकषांवर पक्षांनी उमेदवारी दिल्याने नव्या पण खऱ्या अर्थाने स्वतंत्र विचारांच्या उमेदवारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. पक्ष संघटनांतील कार्यकर्ते, वर्षानुवर्षे काम करणारे पदाधिकारी तिकीट न मिळाल्याने नाराज झाले असून त्यातून बंडखोरीही झाली आहे. काही पक्षांनी तर घराण्याशी संबंधित असले तरी ‘जिंकू शकणारा उमेदवार’ म्हणून डोळे झाकून तिकिटे दिल्याची चर्चा आहे. परिणामी, महापालिकेतील निर्णयप्रक्रिया पुन्हा काही मोजक्या कुटुंबांच्या हातात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मतदारांचा लागणार कस
या पार्श्वभूमीवर पुणेकर मतदार नेमका कोणता संदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ आडनाव, घराणे किंवा ओळखीच्या जोरावर उमेदवार निवडला जाणार की काम, विचार आणि शहराच्या भविष्यासाठीची दृष्टी यावर मत दिले जाणार, हा खरा कस असणार आहे. महापालिका ही शहराच्या दैनंदिन प्रश्नांशी थेट संबंधित असलेली स्वराज्य संस्था आहे. पाणी, रस्ते, वाहतूक, कचरा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत विषयांवर निर्णय घेणाऱ्या या संस्थेत जर पुन्हा एकदा घराणेशाही बळावली, तर ’बदल’ हा फक्त घोषणांपुरताच मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
एकाच घरातून अनेक उमेदवार
या निवडणुकीतील आणखी एक ठळक बाब म्हणजे एकाच घरातून एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याचे प्रमाण जास्त आहे. काही प्रभागांमध्ये एका घरातील दोन सदस्यांनी थेट किंवा वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी दाखल केली आहे. काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकाची पत्नी उमेदवार आहे, तर दुसऱ्या प्रभागात त्याच कुटुंबातील अन्य सदस्य उभा आहे. यामुळे महापालिकेतील सत्ताकारण ही सेवा न राहता ‘कौटुंबिक उद्योग’ बनत असल्याची टीका जोर धरू लागली आहे. मतदारांमध्येही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘नवे चेहरे आणतो म्हणतात, पण आलटून- पालटून घरातीलच माणसे आणतात,’ अशी नाराजी अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. विशेषतः तरुण, सामाजिक कार्यकर्ते, वर्षानुवर्षे इमाने इतबारे पक्षासाठी काम करणाऱ्या इच्छुकांना संधी मिळत नसल्याची खंत उघडपणे व्यक्त केली जात आहे.
कोणत्या नेत्यांची मुले आहेत रिंगणात
यंदाच्या निवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या सोबत दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांना देखील उमेदवारी दिली आहे. माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा राघवेंद्र मानकर हे भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादी कॉंग््रेासकडून निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिवसेना महानगरप्रमुख आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार) पक्षाचे विद्यमान आमदार बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे, सून ऐश्वर्या पठारे आणि भाची तृप्ती भरणे यांच्यासह अनेक राजकीय घराण्यातील नव्या चेहऱ्यांना भाजपसह, राष्ट्रवादी कॉंग््रेासने उमेदवारी दिली आहे.