

PMC Recruitment 2025
पुणे : महापालिकेकडील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ पदांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. एकूण १६९ जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार असून, त्यासंबंधीची सर्व प्रक्रिया महापालिकेकडून पूर्ण करण्यात आली आहे. केवळ परीक्षा घेणाऱ्या आयबीपीएस संस्थेकडील काही तांत्रिक प्रक्रिया बाकी असल्याने जाहिरात प्रसिद्ध होण्यास थोडा उशीर झाला होता.
याआधीच्या जाहिरातीत अर्ज केलेल्या २७,८७९ उमेदवारांपैकी वयोमर्यादा ओलांडलेल्यांना राज्य सरकारने अर्ज करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत.
याशिवाय जातीचा किंवा आरक्षणाचा प्रवर्ग दुरुस्त करण्याची मुभा देखील उमेदवारांना देण्यात आली होती. प्रशासनाने यासाठी दिलेली १२ सप्टेंबरपर्यंतची मुदत ४,४१९ उमेदवारांनी वापरली असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली. मूळत: ३० ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती; मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ती वाढविण्यात आली होती. आता संपूर्ण तयारी पूर्ण झाल्यामुळे पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.