

पुणे: महापालिकेतील स्टेशनरी आणि क्षेत्रीय कार्यालयांसाठीच्या स्वच्छता साहित्याच्या खरेदीवरून सुरू असलेल्या निर्णयांच्या घोळाचा परिणाम आता थेट गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्थेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थायी समितीने साहित्य खरेदीसाठीची प्रक्रियेच्या प्रस्तावाला ब्रेक लावला असून, यापूर्वी घेतलेला डीबीटीचा निर्णयही बदलण्यात आला आहे.
त्यामुळे गणेश विसर्जनासाठी आवश्यक असलेले कृत्रिम घाट आणि अन्य साहित्य अद्याप महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध झालेले नाही. साहित्य खरेदीतील टक्केवारीच्या वादात ही सर्व प्रक्रिया रखडली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी आणि सहाव्या दिवशी शनिवारी शहरातील अर्ध्याहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक साहित्याची उपलब्धता नसल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदाराकडून साहित्य मिळण्याची शक्यताही सध्याच्या परिस्थितीत कमी झाली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात विसर्जन व्यवस्थेसाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
या साहित्य खरेदीसाठी स्थायी समितीने सुमारे महिनाभरापूर्वी मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर पुढच्याच आठवड्यात खरेदी करण्याऐवजी संबंधित साहित्याची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) देण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्टेशनरी आणि बहुतांश स्वच्छता साहित्याचे स्वरूप पाहता अशा पद्धतीने निधी वितरित करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर प्रशासनाने सुधारित फेरप्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला.
मात्र, समितीने त्यावरही उपसूचना देत जेम (GeM) पोर्टलच्या माध्यमातून केवळ ३० टक्के साहित्य खरेदी करण्यास मान्यता दिली. उर्वरित साहित्याची खरेदी महाटेंडरच्या माध्यमातून नव्याने निविदा प्रक्रिया राबवून करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा संपूर्ण प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.
विसर्जनासाठी ताडपत्रींची मागणी
साहित्य खरेदीच्या प्रक्रियेवर स्थायी समितीने ब्रेक लावला असतानाच, गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी क्षेत्रीय कार्यालयांनी घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि मध्यवर्ती भांडार विभागाकडे मोठ्या प्रमाणावर साहित्याची मागणी केली आहे. विसर्जन घाटांवर गणेशमूर्ती झाकण्यासाठी तसेच विसर्जनानंतर त्यांची बंदिस्त वाहतूक करण्यासाठी तब्बल तीन ते चार हजार ताडपत्रींची आवश्यकता असल्याचे कळविण्यात आले आहे.
विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती ताडपत्रीच्या साहाय्याने बंदिस्त करून पुढील प्रक्रियेसाठी खाणींमध्ये पाठविल्या जातात. त्याचबरोबर विसर्जन घाट व परिसरातील स्वच्छता आणि अन्य कामांसाठी झाडू, खराटे, दाते, फावडे, टिकाव, बकेट यांसह तब्बल ३२ प्रकारच्या हार्डवेअर साहित्याचीही मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठीची ही तातडीची गरज लक्षात घेऊनच स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, समितीने पुन्हा निर्णयात बदल केल्याने आता आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्जन व्यवस्थेसाठी आवश्यक साहित्याची तातडीने खरेदी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
“गणेशोत्सवात असलेली तातडीची बाब लक्षात घेऊनच स्थायी समितीत फेरविचार देण्यात आला होता. मात्र, समितीने पुन्हा निर्णय बदलला असल्याने आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल. त्यानुसार तातडीच्या खरेदीचा निर्णय घेतला जाईल.”
- ओम प्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त