

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक गुरुवारी दि.17 सप्टेंबरला जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल तर दहावीच्या परीक्षेसाठी 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 हा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. परंतु यंदा एक महिना उशिरा सप्टेंबर महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात आणि दहावीच्या परीक्षा तिसऱ्या आठवडयात आयोजित केल्या जातात. संबंधित परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत जुलैच्या तिसर्या आठवडयापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात येणार आले आहे.
बारावी लेखी परीक्षा - 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027
बारावी - प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा - 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027
दहावी लेखी परीक्षा - 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027
दहावी - प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा - 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी