Pune Municipal Corporation Bomb Threat: पुणे महापालिकेला बॉम्बस्फोटाची धमकी; मुख्यालय रिकामे, बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी

मुख्यालय आणि महापौर कार्यालय उडवून देण्याचा ई-मेल; तीन महिन्यांतील तिसरी धमकी, तपासणीत संशयास्पद वस्तू आढळली नाही
Pune Municipal Corporation Bomb Threat
Pune Municipal Corporation Bomb ThreatPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे महापालिकेचे मुख्यालय आणि महापौर कार्यालय बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी गुरुवारी ई-मेलद्वारे देण्यात आल्याने महापालिका प्रशासनासह पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या नवीन इमारतीतील कार्यालये तातडीने रिकामी करण्यात आली. बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, पोलिस आणि अग्निशमन दलाने संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू केली. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत आलेला हा धमकीचा तिसरा मेल आहे. प्रशासनाने खबरदरीचा उपाय म्हणून महापालिकेत बॉक्सबंदी केली असून, येणाऱ्या जणाऱ्यांची कसून तपासणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली.

Pune Municipal Corporation Bomb Threat
Pune Chhath Puja: पुण्यात छठपूजेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणार; महापालिकेचे स्वतंत्र धोरण आणि निधीचा ठराव मंजूर

गुरुवारी (दि. १२) दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी पुणे महापालिकेच्या अधिकृत ई-मेलवर हा धमकीचा संदेश प्राप्त झाला. महापालिकेचे मुख्यालय आणि महापौर कार्यालयाला लक्ष्य करण्यात येणार असल्याचा उल्लेख ई-मेलमध्ये करण्यात आला होता. दुपारी ३.११ वाजता स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याने प्रशासनाने तातडीने सुरक्षा यंत्रणांना याची माहिती दिली. यानंतर महापालिकेच्या नवीन इमारतीतील अधिकारी, कर्मचारी, तसेच तेथे आलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाचे जवान महापालिका मुख्यालयात दाखल झाले. इमारतीतील कार्यालये, तसेच संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली.

Pune Municipal Corporation Bomb Threat
Pune Road Survey: पुण्यातील रस्त्यांवर आठवडाभरात ९३ लाख धक्क्यांची नोंद; २४ हजार वाहनांच्या सर्वेक्षणातून दुरवस्थेचे वास्तव उघड

दरम्यान, याच धमकीच्या ई-मेलमध्ये मुंबईतील जुहू येथील अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ निवासस्थानासह गायक दिलजित दोसांझ यांच्या आगामी कार्यक्रमालाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या धमकीची व्याप्ती केवळ पुण्यापुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने महापालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा संदेश पाठवला होता. महापालिका इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. हा संदेश मिळताच प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळवून सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले.

Pune Municipal Corporation Bomb Threat
Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अविश्वास ठरावावर २८ नोव्हेंबरला निर्णय; पदाधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची संधी

सुरक्षा यंत्रणांनी इमारत आणि परिसराची सखोल तपासणी केली. संशयास्पद वस्तू अथवा स्फोटकांचा शोध घेण्यासाठी बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान बॉम्ब किंवा अन्य कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात राज्यातील १९ न्यायालयांना अशाच स्वरूपाचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. त्यानंतर आता पुणे महापालिकेलाही धमकीचा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून, हा ई-मेल कोठून आणि कोणी पाठवला, याचा तपास सुरू आहे. धमकीमागील नेमका उद्देश काय, तसेच ई-मेल पाठवणाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. धमकीच्या ई-मेलमध्ये नमूद केलेली वेळ उलटल्यानंतरही सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी सुरू ठेवण्यात आली होती.

Pune Municipal Corporation Bomb Threat
Pune Grand Tour: पुणे ग्रँड टूरसाठी रस्तेविकासकामांना वेग; २० नोव्हेंबरनंतर खोदाई केल्यास चौपट शुल्क

महापालिकेत बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेल दुपारी ३ वाजता महापालिकेच्या अधिकृत मेलवर आणि आयुक्तांच्या मेलवर प्राप्त झाला होता. त्यानुसार पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिस आणि बॉम्बशोधक पथक महापालिकेत दाखल झाले. महापालिकेत सर्व ठिकाणी तपासणी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेत बॉक्स आणण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून चौकशी आणि तपासणी करूनच त्यांना कार्यालयात सोडले जाणार आहे.

प्रजित नायर, अतिरिक्त आयुक्त महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.