नगर: शहरातील गाळेधारकांकडे असलेली 25 कोटींची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कंबर कसली आहे. एका पाठोपाठ एक व्यापारी संकुलातील गाळेधारकांना जप्ती नोटीसा पाठविल्या जात आहेत. टीव्ही सेंटर येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलातील 45 गाळेधारकांकडे 80 लाख 69 हजाराच्या थकबाकीसाठी जप्तीची नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. तत्काळ थकबाकी भरा अन्यथा गाळे जप्तीचा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे.
गंज बाजार, सर्जेपूरातील रंगभवन, सिध्दीबाग, प्रोफेसर चौक व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्यानंतर आता टीव्ही सेंटर येथील सावित्रीबाई फुले फेज 1 व फेज 2 या व्यापारी संकुलातील थकबाकीदार 45 गाळेधारकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. (Latest Ahilyanagar News)
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शहरातील गाळेधारकांकडे सुमारे 25 कोटींची थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. मार्च महिन्यात थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीसा बजावल्या, पण त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यानंतर शहरातील सर्व गाळे, खुल्या जागा, वर्ग खोल्या आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला. त्यानुसार जप्ती नोटीसा बजावण्याचा सपाटा सुरू आहे.
सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे बहुतांश करारनामेही संपुष्टात आलेले आहेत. वारंवार सूचना देऊनही थकीत भाडे न भरल्यामुळे या थकबाकीदार गाळेधारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 81(ब) नुसार जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकी भरण्यासाठी प्रतिसाद न मिळाल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.