

पुणे: शहरातील मुळा-मुठा नदीच्या स्वच्छता आणि पुनरुज्जीवनाच्या कामांना गती देताना पर्यावरणीय निकषांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नदीसंवर्धनासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.
केंद्र सरकारच्या सहकार्याने पुण्यात मुळा-मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत विविध कामे सुरू असून, त्यांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी महापालिकेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुंडे यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
बैठकीस महापौर मंजूषा नागपुरे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, प्रजित नायर, विधी समितीच्या अध्यक्षा स्वरदा बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुंडे यांनी सांगितले की, अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले गेले असले, तरी त्यांची नियमित देखभाल होत नसल्याने अनेक प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व एसटीपी प्रकल्प पूर्णक्षमतेने कार्यरत राहतील, यासाठी महापालिकेने विशेष लक्ष द्यावे.
बैठकीदरम्यान आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील सांडपाणीनिर्मिती, प्रक्रियाक्षमता, प्रकल्पांची अंमल बजावणी आदीबाबतचे सादरीकरण केले. वारजे, वडगाव, मुंढवा, मत्स्यबीज केंद्र हडपसर, खराडी, धानोरी, बाणेर आणि तानाजीवाडी-भैरोबा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.