

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत वारंवार होणाऱ्या बदलांमुळे आणि प्रस्तावित निर्णयांवर असंतोष व्यक्त करत पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएससी विद्यार्थी (तिसरा गट) ठिय्या आंदोलन करत आहेत. चार वर्षांपूर्वी लागू केलेला वर्णनात्मक परीक्षा पॅटर्न कायम ठेवावा, या प्रमुख मागणीसाठी येथील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून (अलका टॉकीज चौक) टिळक चौकात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे.
आंदोलनातील विद्यार्थी प्रसाद दरेकर यांनी स्पष्ट केले की, एमपीएससीमध्ये रचनात्मक सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. सुधारणांसाठी आवश्यक असल्यास आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यात यावा. मात्र, सध्याची वर्णनात्मक परीक्षा पद्धतच कायम ठेवून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत.
विद्यार्थ्यांनी मांडल्या प्रमुख चार मागण्या
१) एमपीएससीचा लागू करण्यात आलेला वर्णनात्मक (डिस्करीपटीव्ह) पॅटर्न कायम ठेवावा.
२) विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी मिळून चर्चा व्हावी.
३) एमपीएससीमधील सुधारणांसाठी गरज भासल्यास एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घेतला जावा.
४) व्ही. राधा समितीच्या कार्यवाहीबाबत विद्यार्थी समाधानी असून, त्यांच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी व्हावी.
आमचा रोहित पवार किंवा इतर कोणत्याही नेत्यांच्या आंदोलनाला आजिबात विरोध नाही. एमपीएससीच्या प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्यासाठी जर अध्यक्षांचा राजीनामा आवश्यक असेल, तर तो नक्कीच झाला पाहिजे. परंतु, गेल्या चार वर्षांपासून ज्या वर्णनात्मक (डिस्करीपटीव्ह) परीक्षा पद्धतीचा विद्यार्थी अभ्यास करत आहेत, तीच पद्धत कायम ठेवली पाहिजे. या पद्धतीत काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी शासनाने प्रामाणिक प्रयत्न करावेत. आमचे शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्यास उत्सुक असून, व्ही राधा समितीच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
- प्रसाद दरेकर, एमपीएससी विद्यार्थी