

पुणे: एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांच्या आंदोलनात दिवसभर घोषणांचा आवाज घुमतोय. हजारो विद्यार्थी सकाळपासून रात्रीपर्यंत येथे उपोषणात बसले आहेत. ही मुले उपाशी राहू नयेत, यासाठी अनेक जण पुढे आले आहेत.
या मुलांसाठी कुठे चपात्या लाटल्या जात आहेत, कुठे भाकरी थापल्या जात आहेत, तर कुठे भाजी आणि मसाला राईस तयार होत आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांशी पुणेकरांनी मायेची शिदोरी उघडली असून, पाच हजार चपात्या, दोन हजार भाकऱ्या, पाच हजार जणांसाठी सुकट भाजी-मसाला राईसपासून चटणी- चपाती, सामोसे आणि सुगंधी दुधापर्यंतचा उत्स्फूर्त अन्नपुरवठा आंदोलनस्थळी सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाच्या धगेसोबतच पुणेकरांच्या सामाजिक बांधिलकीची 'चव'ही अनुभवायला मिळत आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवर विविध आंदोलनांच्या वेळी आंदोलकांसाठी ज्या पद्धतीने अन्नछत्रे आणि भोजनव्यवस्था केली होती, त्याच धर्तीवर पुण्यातील एमपीएससी आंदोलनातही आपुलकी दिसून येत आहे.
आंदोलन लांबत असताना विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागू नये, यासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समूहांकडून आपल्या परीने मदत केली जात आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून हा ओघ सुरू आहे. बुधवारी तर आंदोलकांसाठी तब्बल पाच हजार चपात्या, दोन हजार भाकरी आणि सुमारे पाच हजार जणांसाठी सुकट भाजी व मसाला राईसचा पुरवठा करण्यात आला.
विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन तयार होते अन्न
आंदोलक विद्यार्थ्यांना होणारा भोजनाचा हा पुरवठा कोणत्याही एका संस्थेपुरता मर्यादित नसून पुणेकरांकडून उत्स्फूर्तपणे सुरू आहे. आंदोलनस्थळी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात अन्न तयार केले जात आहे. कुणी चपात्यांची जबाबदारी घेतली आहे, तर कुणी भाजी किंवा भाकरीची. काही जण नाष्ट्याची व्यवस्था करीत आहेत, तर काही जणांनी पिण्याच्या पाण्याची जबाबदारी घेतली आहे.