‘पुणे-मिरज’ दुहेरीकरण वर्षभरात; रेल्वे अधिकार्‍यांचा विश्वास; 125 किमीचे काम बाकी

‘पुणे-मिरज’ दुहेरीकरण वर्षभरात; रेल्वे अधिकार्‍यांचा विश्वास; 125 किमीचे काम बाकी
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावरील गाड्यांची संख्या तसेच त्यांचा वेग वाढणार आहे. त्यामुळे पुणे-मिरज-कोल्हापूर या भागातील रेल्वे प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे तसेच मालवाहतुकीला गती
प्राप्त होईल. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरणाचे काम 2017 मध्ये हाती घेण्यात आले. मात्र, अद्याप ते पूर्ण झालेले नाही. या कामासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला आहे.

तसेच, येत्या जून 2024 पर्यंत ही कामे पूर्ण होणार असल्याचे रेल्वे प्रशासन सांगत आहे. दरम्यान, या कामांना उशीर का लागला? याबाबत रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या भागात डोंगराळ प्रदेश असल्याने दुहेरीकरणाचे काम सध्या संथ गतीने सुरू आहे. भूसंपादनाच्या कामामुळे मध्यंतरीच्या काळात हे काम काही काळ रखडले होते. आता ते सुरू करण्यात आले असून, रेल्वे प्रवाशांना 2024 मध्ये या मार्गावरून प्रवास करता येणार आहे.

महाव्यवस्थापकांकडून पाहणी

मागील महिन्यात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्यासह पुणे रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांनी पुणे-मिरज दुहेरीकरणाच्या कामाची नुकतीच पाहणी केली आहे. त्यामुळे आता या कामांचा वेग लवकरच वाढणार असल्याचे दिसत आहे.

ही कामे होणार…

  • रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण
  • फाउंडेशन करणे
  • ट्रॅक तयार करणे
  • छोटे प्लॅटफॉर्म तयार करणे
  • मार्गावर सिग्नलिंग यंत्रणा
  • विद्युतीकरण
  • स्टेशन बिल्डिंग उभारणे
  • स्टेशन प्लॅटफॉर्म तयार करणे

आकडे बोलतात…

  • रेल्वेमार्गाची एकूण लांबी – 280 किमी
  • दुहेरीकरण झालेला मार्ग – 155 किमी
  • येत्या वर्षात होणारे दुहेरीकरण – 125 किमी
  • प्रकल्पाचा खर्च – 2436 कोटी रु.
  • प्रकल्पाचा प्रारंभ – 2017
  • प्रकल्प पूर्ण – जून 2024

पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आमच्याकडील बांधकाम विभागाकडून हे काम सुरू आहे. 2017 मध्ये या कामाला सुरुवात झाली असून, 155 किलोमीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. तर, 125 किमीचे बाकी असलेले काम जून 2024 पर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत.

                                        – अजय कुमार, जनसंपर्क अधिकारी,
                                                    रेल्वे, पुणे विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news