

पुणे: पुणे मेट्रो टप्पा-1च्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. या 5.46 कि.मी. लांबीच्या संपूर्ण भुयारी मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या पहिल्या “टीबीएम टनेल सेगमेंट”च्या कास्टिंग कामाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 12) संपन्न झाले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे काम सुरू करण्यात आले. याप्रसंगी महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग््रावाल, हरेंद्र पांडे यांच्यासह पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार कंपनी “षसीईएम इंडिया”चे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वारगेट ते कात्रज हा मार्ग पूर्णतः भुयारी असून, त्याचे बांधकाम अत्याधुनिक “टनेल बोअरिंग मशीन”द्वारे केले जाणार आहे. या बोगद्याच्या अंतर्गत मजबुती करणासाठी प्रीकास्ट आरसीसी सेगमेंटचा वापर केला जातो. या 9.7 कि.मी. (दोन्ही बाजूंचे बोगदे मिळून) लांबीच्या मार्गासाठी एकूण 6,993 रिंग्स तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक रिंग ही 5 अधिक 1 या रचनेत असेल. यासाठी ”सीबीई ग््रुाप”चे 8 विशेष साचे वापरले जात आहेत. बोगद्याचा बाह्य व्यास 6.35 मीटर असून, अंतर्गत व्यास 5.8 मीटर आहे. प्रत्येक सेगमेंटची जाडी 275 मि.मी. असून, रिंगची रुंदी 1.4 मीटर आहे.
या मार्गिकेवरील नियोजित स्थानके
स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गिकेमुळे दक्षिण पुणे थेट मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार आहे. या मार्गावर एकूण पाच महत्त्वाची भुयारी स्थानके असतील.
मार्केट यार्ड
बिबवेवाडी
पद्मावती
बालाजीनगर
कात्रज
स्वारगेट ते कात्रज हा मार्ग पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या सेगमेंटचे कास्टिंग सुरू होणे हा या प्रकल्पाच्या वेगाचे प्रतीक आहे. दर्जा आणि सुरक्षिततेची सर्व मानके पाळून हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या मार्गिकेमुळे स्वारगेट, धनकवडी, पद्मावती आणि कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे.
श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो