

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मेट्रो प्रशासनाने गणेश विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत गरवारे ते वनाज मार्गावर मेट्रोची सेवा सुरू ठेवली होती. त्याद्वारे मेट्रो प्रशासनाला 3 लाख 49 हजार 910 रुपयांचे उत्पन्न मिळाले. या वेळी 22 हजार 890 प्रवाशांनी मेट्रोद्वारे प्रवास केला. मेट्रोची पहिल्या टप्प्यातील गरवारे ते वनाज मार्गावर नुकतीच सेवा सुरू झाली आहे. त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर या सेवेचा पुणेकरांना लाभ घेता येत आहे.
सध्या या पहिल्या टप्प्याचा पुणेकरांना प्रवासासाठी म्हणावा तितका फायदा होत नसला, तरी मेट्रोचे शहरातील काम पूर्ण झाल्यावर पुणेकरांना प्रवासासाठी मोठा फायदा होणार आहे. इतर दिवशी दररोज मेट्रोची सेवा सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंतच असते. मात्र, मेट्रो प्रशासनाने गणेशोत्सव काळात या सेवेच्या काळात वाढ केली. गणेशोत्सव काळात मेट्रो ट्रेन गरवारे ते वनाज मार्गावर सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत धावत होती.
परंतु, गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मेट्रो प्रशासनाने यात आणखी वाढ केली. सकाळी 8 ते मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत मेट्रो ट्रेन धावत होत्या. त्याचा मेट्रोला फायदा झाला असून, हे अधिकचे उत्पन्न मिळाले आहे, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले.
22890 प्रवाशांनी केला गरवारे ते वनाज मार्गावर प्रवास
मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होती मेट्रोची सेवा