Pune Market Yard vegetable price drop
पुणे: साप्ताहिक सुटी त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी भाजीपाला बाजार बंद राहिल्याने सोमवारी (दि. 8) मार्केट यार्डात फळभाज्यांची मोठी आवक झाली. मात्र, मालाला अपेक्षित उठाव न मिळाल्यामुळे कांदा, बटाटा आणि लसूण वगळता सर्व फळभाज्यांच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
तर कांदा, बटाटा आणि लसणाचे भाव मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. सोमवारी बाजारात मोठी म्हणजे तब्बल 100 गाड्या आवक झाली. नियमित सोमवारचा विचार केल्यास ही आवक दुप्पट आहे. (Latest Pune News)
नियमित सोमवारी सरासरी 50 गाड्यांची आवक होत असते. जिल्ह्यासह संपूर्ण पुणे विभागातून ही आवक झाली आहे. मात्र, गणपतीच्या विसर्जनाच्या माहोलमधून नागरिक, विक्रेते अद्याप बाहेर आले नाहीत. त्यामुळे मालाला कमी उठाव होता. काही गाळ्यावर तर मागणीअभावी भाव शिल्लक राहिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
घाऊक बाजारात कांद्याला मागील आठवड्यात किलोला दर्जानुसार 12 ते 15 रुपये, बटाट्याला 12 ते 17 रुपये, तर लसणाला 30 ते 35 रुपये भाव मिळाला होता. तो भाव या आठवड्यातही स्थिर असल्याचे या वेळी सांगण्यात आले.