

पुणे: राजस्थानसह अहिल्यानगर येथील संत्रीचा हंगाम बहरल्याने गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळबाजारात संत्रीची आवक वाढली आहे. रविवारी बाजारात पंचवीस टन संत्री विक्रिसाठी दाखल झाली. त्यातुलनेत मागणी कमी असल्याने संत्रीच्या भावात वीस टक्क्यांनी घसरण झाली, अशी माहिती संत्रीचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी दिली. केरळ तसेच बांग्लादेश येथून मागणी घटल्यामुळे पुण्यातील बाजारात आवक वाढल्याचे निरीक्षण व्यापारी वर्गाकडून नोंदविण्यात आले.
बाजारात होत असलेल्या आवकच्या तुलनेत मागणी वाढल्याने कलिंगड आणि पपईच्या भावात किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली. कर्नाटक आणि गुजरातसह स्थानिक भागातून किरकोळ स्वरुपात डाळींबाची आवक सुरू होत आहे.
राज्यातील डाळींबाचा हंगाम सुरू होण्यास अद्याप महिनाभराचा अवकाश आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत डाळींबाची आवक कमीच असल्याने डाळींबाचे तेजीतील दर कायम आहेत. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने दर टिकून असल्याचे सांगण्यात आले.
फळबाजारात रविवारी (दि. 1) मोसंबीची 45 ते 60 टन, संत्रा 40 ते 50 टन, डाळिंब 15 ते 20 टन, पपई 15 ते 16 टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 8 ते 10 टेम्पो, खरबूज 10 ते 12 टेम्पो, चिक्कू 2 हजार गोणी, पेरु 300 तर 350 क्रेट, अननस 6 ट्रक आणि बोरांची 200 ते 250 पोती इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 200-400, मोसंबी : (3 डझन) : 100-500, (4 डझन) : 30-280, संत्रा : (10 किलो) : 250-900, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 100-300, आरक्ता : 20-100, गणेश : 10-40, कलिंगड : 12-25, खरबूज : 15-25, पपई : 12-30, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 600-700, अननस (1 डझन): 100-600, बोरे (10 किलो) : चमेली 350-450, चेकनट 800-1000, उमराण 100-120.