

पुणे: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू झाली असून, प्रवेशप्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राज्यभर कार्यशाळांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमध्ये कार्यशाळा पार पडली असून, या कार्यशाळांद्वारे महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासनाला थेट मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सीईटी सेलकडून 15 जुलैपासून सुरू झालेल्या या कार्यशाळांमध्ये रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमध्ये आतापर्यंत मार्गदर्शन सत्र पार पडले असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. रत्नागिरीतील पहिल्या कार्यशाळेला 300 हून अधिक शिक्षक उपस्थित होते. पुण्यातील सत्राला तब्बल 1200 शिक्षकांनी हजेरी लावली, तर कोल्हापूरच्या सत्रात 700 पेक्षा अधिक शिक्षक सहभागी झाले. (Latest Pune News)
या सत्रांमध्ये उच्च शिक्षण विभागाचे विशेष कार्य अधिकारी जयंत पाटील, कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम, वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमाचे समन्वयक सिद्धेश नर, तंत्रशिक्षणातील अधिव्याख्याता मोरेश्वर भालेराव तसेच कला शिक्षण विभागाच्या सुचित्रा मिटकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सीईटी परीक्षा संगणक पद्धतीने घेणे, निकाल जाहीर करणे, उमेदवारांचा पसंतीक्रम, प्रवेश यादी, कागदपत्रांची अचूकता, आरक्षणाचे निकष, शैक्षणिक शुल्क, एनआरआय विद्यार्थ्यांचे प्रवेश या सर्व बाबींचे सखोल स्पष्टीकरण या कार्यशाळांमध्ये करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत क्षुल्लक कारणाने नकार मिळू नये, यासाठी महाविद्यालयांचे शिक्षक व कर्मचारी सजग राहावेत, यावर भर देण्यात आला.
पुढील टप्प्यात राज्यातील इतर विभागांमध्येही कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी कक्षाने दिली आहे. यामुळे ही कार्यशाळा केवळ माहितीपर न राहता, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवादात्मक व चर्चात्मक स्वरूप घेत असल्याचे दिसून आले आल्याचेही कक्षाकडून सांगण्यात आले. पुढील टप्प्यात प्रत्येक विभागातील प्रमुख शहरांमध्ये ही कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न असून, पुढील काही दिवसांत नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक अशा ठिकाणी कार्यशाळा पार पडणार असल्याचे सीईटी सेलच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे कार्यशाळेचा उद्देश?
महाविद्यालयांचे प्रतिनिधी, प्राचार्य, नोडल अधिकारी यांना प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची अचूक माहिती देणे.
ऑनलाइन प्रणाली, दस्तऐवज पडताळणी, पसंतीक्रम भरताना होणार्या चुकांची जाणीव करून देणे.
तांत्रिक किंवा अंमलबजावणीतील अडचणींवर उपाय सुचवणे.
विद्यार्थ्यांना वेळेवर व योग्यरीत्या प्रवेश मिळवून देण्यात महाविद्यालयांना सक्षम करणे.
विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना होणार्या सामान्य चुका टाळण्याचे उपाय.
प्रवेशासाठी लागणार्या कागदपत्रांची अचूक यादी.
एनआरआय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वेगळ्या अटी व प्रवेशपद्धती.