पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आणि 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा महाराष्ट्राचे वैभव आहे. या दोन्हींचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण, 'महाराष्ट्र केसरी' विजेता मल्ल राज्यातच अडकलेला दिसून येतोय. त्यांनी राज्यात अडकून न राहता मोठी स्वप्ने बघायला हवीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची त्यांची क्षमता आहे, ती त्यांनी सिद्ध करावी, असे आवाहन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उपांत्य फेरीची कुस्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लावण्यात आली.
गदा देऊन फडणवीस यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या वेळी हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, बाळा भेगडे, बापू पठारे, आयोजक प्रदीप कंद, संदीप भोंडवे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. योगेश दोडके व पै. विलास कथुरे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, 'महाराष्ट्राचा पहिलवान पदक प्राप्त करेल, अशी सगळेजण वाट पाहत असतात.
मागील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेपासून पहिलवानांचे मानधन वाढवले आहे. मागील महाराष्ट्र केसरीपासून पहिलवानांच्या खुराकाचा खर्चदेखील वाढवला आहे. मल्लांच्या साधनांसाठीदेखील अनेक योजना आहेत. राज्याचे सरकार मल्लांच्या मागे उभे आहे. मल्लांसाठी ज्या सोयी आवश्यक आहेत त्या आम्ही त्यांना देऊ. पण, मल्लांनी 'केसरी'किताबात न अडकता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे इतकीच आमची अपेक्षा आहे.'
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सध्या सुरू असलेली राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा रोखण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. आयोजकांना 'महाराष्ट्र केसरी' हे नाव वापरण्याची परवानगी देऊ नये, असेही परिषदेने याचिकेत म्हटले होते. मात्र, तीन दिवसांच्या चौकशीनंतर न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या बाजूने निर्णय देताना सध्या सुरू असलेल्या स्पर्धेस आणि र'महाराष्ट्र केसरी' हे शीर्षकही वापरण्यास परवानगी दिल्याची माहिती या वेळी राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिली.
हेही वाचा