Local Bodies Election: आम्ही स्वबळावर महापालिका निवडणूक लढणार..! प्रमुख पक्षांचा नारा

स्थानिक मुद्द्यांना पुढे ठेवून महापालिका निवडणूक लढवणार
pune municipal corporation
आम्ही स्वबळावर महापालिका निवडणूक लढणार..! प्रमुख पक्षांचा नाराPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्यात याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत सर्व पक्षांनी केले असून, महापालिकेच्या निवडणुकांच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष व कार्यकर्ते लागले आहेत. पुण्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह प्रमुख पक्षांनी एकत्र लढण्याबाबत स्पष्टता नसल्याने स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असे म्हणत निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यांत काढावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. (latest pune news)

pune municipal corporation
Pune Traffic: उड्डाणपूल उभारूनही वाहतूक कोंडी कायम; कधी सुटणार प्रश्न

यामुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुण्यातील सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पुण्यातील पाणीटंचाई, खराब रस्ते, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी आदी प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे.

पुण्यात भाजपचे संघटन मजबूत : घाटे

पुण्यात भाजपचे संघटन चांगले आहे. गेल्या टर्ममध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे महापौर झाले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरात भाजपचे संघटन अतिशय मजबूत केले. भाजपने निवडणुकीच्या दृष्टीने आधीच तयारी सुरू केली आहे. शहरात साडेपाच लाख प्राथमिक पक्षसदस्यांची नोंदणी पक्षाने पूर्ण केली आहे. त्याबरोबर नऊ हजार सक्रिय सदस्यनोंदणीचे लक्ष्य अंतिम टप्प्यात आहे.

pune municipal corporation
Pune: महापालिका निवडणुकीसाठी 2002चा फॉर्म्युला वापरावा; उज्ज्वल केसकर व सुहास कुलकर्णी यांची मागणी

गेल्या निवडणुकीत भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले होते. विविध पक्षांतून पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, या वेळी 105 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट असल्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्पष्ट केले आहे.घाटे म्हणाले, आम्ही पक्ष म्हणून निवडणुकीसाठी सज्ज आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला निर्विवाद यश मिळवून दिले.

पुणे लोकसभेसह लढविलेल्या विधानसभेच्या सहाही जागा आम्ही जिंकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार यांच्या माध्यमातून पुणे आणि परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपने मोठ्या प्रमाणात पायाभूत विकासकामे केली आहेत. त्यामुळेच महापालिकेतही पुणेकर भाजपला विजयी करतील, असा विश्वास वाटतो.

आधीपासूनच निवडणूक तयारी : शिंदे

निवडणुकीसंबंधीच्या निर्णयाचे स्वागत करतच काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, न्यायालय निवडणुका घेण्याचे आदेश देईल याची कल्पना होती. त्यामुळे आम्ही यापूर्वीच तयारीला लागलो होतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. सर्व कागदोपत्री तयारी झाली असून, प्रभागनिहाय आम्ही निरीक्षक नेमले आहेत. बूथ कमिट्या देखील तयार आहेत. निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर उमेदवारांचे अर्ज मागविले जातील. या निवडणुकीत भाजपने केलेला भ्रष्टाचार हा मुख्य मुद्दा राहणार असल्याचे शिंदे म्हणाले.

भाजपचा भ्रष्टाचार अन् पुण्याची दैना हाच निवडणुकीचा मुद्दा : मोहन जोशी

महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार असून, गेल्या 10 वर्षांत विकासकामांमध्ये भाजपने केलेला भ्रष्टाचार आणि पुणे शहराची केलेली दैना, याविरोधात जनतेकडे मते मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्यासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, लोकशाहीच्या दृष्टीने तो एक ऐतिहासिक आहे, असे मोहन जोशी यांनी म्हणत, निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष तयारीनिशी उतरत आहे. भाजपच्या भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभारामुळे पुणेकर वैतागलेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला धडा शिकवल्याशिवाय पुणेकर राहणार नाहीत.

पुणेकरांना चांगली पीएमपी बससेवा भाजप देऊ शकला नाही. मुळा-मुठा नद्या सुशोभीकरण, शुद्धीकरण यातही भाजपला अपयश आलेले आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्याची फक्त आश्वासने पुणेकरांना देण्यात आली. प्रत्यक्षात ती कोंडी अजूनही सुटलेली नाही. भाजपच्या अशा अनेक फसव्या घोषणा आणि भ्रष्टाचार आम्ही पुणेकरांपुढे मांडणार आहोत, असे मोहन जोशी म्हणाले.

न्यायालयीन लढ्याला यश : जगताप

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, 37 जणांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून, निवडणुकीबाबतची चार आठवड्यांत अधिसूचना काढण्याचेही आदेश दिले गेले आहे. यासोबतच ओबीसीची जो काही डेटा असेल तो सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आमच्या पक्षाची निवडणुकीची तयारी आहे. महाविकास आघाडीसोबत किंवा स्वबळावरही लढण्याची आमची तयारी आहे. पक्षाचे नेते शरद पवार जो आदेश देतील त्याचे पालन केले जाईल.

यायालयाचा निर्णय स्वागतार्ह : प्रमोद भानगिरे

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिले असून, हा निर्णय लोकशाही प्रक्रियेला बळकटी देणारा आणि स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.

या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लांबल्या होत्या. परिणामी, शहराचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात होता, जो केवळ तात्पुरता पर्याय असतो. लोकशाही व्यवस्थेत खरा कारभार हा जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातूनच पार पडला पाहिजे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत योग्य वेळी आलेला असून, तो स्वागतार्ह आहे.

लोकशाहीची खरी ताकद ही जनतेच्या थेट सहभागात आणि प्रतिनिधित्वात असते. लोकप्रतिनिधींना त्यांच्या प्रभागातील समस्या, गरजा, स्थानिक लोकभावना आणि विकासाची प्राथमिकता यांची अधिक चांगली समज असते. निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेले नगरसेवक शहराच्या कारभारात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गती घेऊन येतील, असा आमचा ठाम विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news