

पुणे: प्रशासकराज असलेल्या महापालिकांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश कोर्टाने दिले असून पुणे महापालिकेच्या निवडणुका जाहीर करताना 2002 मधील निवडणुकीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी 2002 चा फॉर्म्युला वापरा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर व सुहास कुलकर्णी यांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेत पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सन 2018 मध्ये 11 आणि सन 2019 मध्ये 23 अशी एकूण 34 गावे समाविष्ट झालेली आहेत. याआधी पुणे महापालिकेची प्रभाग रचना सन 2017 मध्ये झालेली आहे.
त्यामुळे पालिकेतील जुन्या हद्दीतील प्रभाग रचना तयार असून 11 पैकी 2 गावे पालिका हद्दीतून वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे सध्या केवळ 32 गावांच्या हद्दीतील प्रभाग रचना तयार करणे बाकी आहे. 2002 मध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र त्यावेळी आधी जुन्या हद्दीतील प्रभागांची निवडणूक घेण्यात आली व त्यानंतर महिनाभराने समाविष्ट गावांमधील हद्दीतील प्रभागांची स्वतंत्र निवडणूक घेण्यात आली होती. या दोन्ही निवडणुकीची एकाचवेळी मतमोजणी केली होती. ही स्थिती येणार्या पालिकेच्या निवडणुकांमध्ये निर्माण झाली असून या साठी 2002 चा फॉर्म्युला योग्य ठरणार असल्याचे मत उज्ज्वल केसकर यांनी व्यक्त केले आहे.(Latest Pune News)
आता कोणत्याही परिस्थितीत लोकप्रतिनिधींची महानगरपालिका असणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो आणि राज्य निवडणूक आयोगाने उर्वरित गावांची त्वरित प्रभाग रचना सुरू करावी आणि त्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करावे अशी आमची मागणी आहे.
- उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते, पुणे