वाल्हे: कांदा पिकांवर वातावरणामधील बदलामुळे अनेक रोग पडले आहेत. वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात कांदा पिकांवर बगळा (कांद्याची मान लांब होऊन कांदा पोसत नाही), स्थिर्प्स (काद्यांच्या पाती पिवळ्या पडून वाकड्या होतात), करपा रोग पडल्याने पीक संकटात सापडले आहे. शासनाने कांदा पिकांच्या होत असलेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कांदा पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाल्हे येथील प्रयोगशील शेतकरी कैलास पांडूरंग भुजबळ यांनी 10 गुंठे क्षेत्रावर कांद्याची लागवड मागील सव्वादोन महिन्यांपूर्वी केली. लागवड केलेले कांदा रोप अचानक मान टाकत आहे. त्या रोपांची प्रतिकार शक्तीच कमी होऊन ती बसून जात आहे. हा प्रकार समजत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Latest Pune News)
कांदा लागवडीपासून तर बाजारात नेण्यापर्यत शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी आहे. सध्याच्या भावात कांद्याच्या लागवडीचा खर्च देखील वसूल होणे शक्य नसल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले. सध्याच्या वातावरणातील बदलामुळे पुढील काही दिवसांत कांदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर शेतकरी महागडी औषधे फवारून पीक वाचविण्यासाठी धडपडत आहेत.
कांदा उत्पादन खर्च
साधारण 10 गुंठे कांदा लागवडीसाठी कांदा बियाणे प्रति एक किलो 1500 ते 2000 रूपये, शेत नांगराने सरी काढणे, सरी तोडणी आणि कांदा लागवड यासाठी सात ते आठ हजार रूपये मजुरी, औषधे व खते सहा हजारापर्यंत असा साधारण आठ हजार इतका खर्च झाला. पावसाने दडी मारली असतानाही शेतकऱ्यांनी धाडसाने खर्च केला.
मात्र, कांदा पिकांवर विविध रोग पडत असल्याने औषध फवारणीचा खर्च वाढत चालला आहे असे कैलास भुजबळ यांनी सांगितले. शिवाय रात्री व अपरात्री कांद्याला पाणी द्यावे लागते. एवढी मेहनत आणि पैसे खर्च करून कांदा पीक शेतकरीवर्गाच्या हाताला लागेल याची शाश्वती नाही. शासनाने पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.