

पुणे: हडपसर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार कोयते जप्त केले. ही हत्यारे एका अल्पवयीन आरोपीच्या घरात त्याच्या आईच्या परवानगीने लपवण्यात आली होती. त्यामुळे या गुन्ह्यात त्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वजित ऊर्फ यश रामचंद्र मोरे (20, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मोरे याच्यासह त्याचा अल्पवयीन साथीदार आणि त्या अल्पवयीनाच्या आईवर गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Pune News)
पुणे पोलिसांकडून 8 ऑगस्ट रात्री 11 ते पहाटे 2 वाजेपर्यंत संपूर्ण शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. हडपसर पोलिस ठाण्याच्या पथकाने या कारवाईदरम्यान विश्वजित आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला संशयावरून पकडले. चौकशीत अल्पवयीनाच्या घरात चार लोखंडी कोयते सापडले.
हे कोयते त्याची आईच्या परवानगीने घरात ठेवले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात अल्पवयीन तरुणाच्या आईला सहआरोपी केले आहे. यापूर्वी अल्पवयीनांना वाहने चालविण्यास देणार्या पालकांवर गुन्हे दाखल केले होते. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.