

Arala River Flood Alert
वाडा : खेड तालुक्यातील पश्चिम व पूर्व पट्टा तसेच आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारासाठी जीवनदायिनी ठरलेले कळमोडी धरण सोमवारी (दि.६) रात्री शंभर टक्के भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरताच सांडव्यातून ६,७५९ क्युसेक्स वेगाने विसर्ग आरळा नदीपात्रात सुरू झाला आहे. याबाबत धरण प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी माहिती दिली.
विशेष म्हणजे, सलग चौथ्या वर्षी कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे खेडच्या पश्चिम भागातील नागरिक, शेतकरी आणि पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा धरणात ४२.८७ दशलक्ष घनमीटर (१.५१४ टीएमसी) इतका जलसाठा झाला आहे.
सन २०१० पासून कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरू लागले आहे. या धरणाला कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. त्यामुळे धरण भरताच सांडव्यातून आपोआप पाण्याचा विसर्ग सुरू होतो. धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
१ जूनपासून धरण क्षेत्रात ५२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी कळमोडी धरण २४ जून रोजी भरले होते. तर यंदा ते ११ दिवस उशिराने ६ जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरले. धरण भरल्यामुळे चासकमान धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
कळमोडी प्रकल्पामुळे चिखलगाव, साकुर्डी, देवोशी, कुडे, बांगरवाडी, येनिये, घोटवडी यांसह अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर सिंचनाचा लाभ होतो. तसेच पश्चिम भागातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. धरण भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून खरीप हंगामासाठीही मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, धरण परिसरातील दगडी साठा तातडीने बाहेर काढावा तसेच चिखलगाव-डामसे वस्ती येथे पुलकम बंधारा उभारावा, अशी मागणी कळमोडी प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे आणि ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे.
यंदा चासकमान धरणात ३६.१४ टक्के जलसाठा असून, गतवर्षी याच कालावधीत तो ७८.६४ टक्के होता. तर भामा आसखेड धरणात ५३.३५ टक्के जलसाठा असून, गतवर्षी तो ५७.८१ टक्के होता. धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास ही धरणेही लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरळा नदीपात्रालगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रातील शेतीची अवजारे, साहित्य तसेच जनावरे तातडीने सुरक्षित स्थळी हलवावीत. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.