

Pune Kasba Peth Firing: कसबा पेठ परिसरात सोमवारी सकाळी कौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिजीत शंकर शिंगोटे हे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उजव्या खांद्यावर गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटना सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कसबा पेठेतील जुन्या काळभैरव मंदिराजवळील एका इमारतीत घडली. शिंगोटे आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती आहे. दोघांमधील कौटुंबिक वादाचे प्रकरण न्यायालयातही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमधील वाद वाढल्यानंतर गोळीबार झाला. शिंगोटे यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून घेतल्याची माहिती सुरुवातीला समोर आली. मात्र, हा प्रकार नेमका कसा घडला, गोळी स्वतःहून झाडली की अन्य काही घडले, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे या घटनेबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळी रक्ताचे डाग, एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळल्याची माहिती आहे. शस्त्र नेमके कोणाच्या नावावर आहे आणि गोळीबाराच्या वेळी ते कोणाच्या ताब्यात होते, याचाही तपास केला जात आहे.
जखमी अभिजीत शिंगोटे यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमागील नेमके कारण आणि गोळीबाराची संपूर्ण माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.