

Illegal Construction Demolition Jejuri Pune
जेजुरी : जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळी परिसरात पाचमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. ही इमारत रविवारी (दि. १०) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक एका बाजूला धोकादायकरीत्या झुकली. त्यामुळे परिसरात धोका निर्माण झाला होता. एकच खळबळ उडाली. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सोमवारी (दि. ११) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही धोकादायक इमारत सुरक्षितपणे पाडली.
जेजुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळीतील बांधकामाधीन इमारत रविवारी अचानकच एका बाजूला धोकादायकरीत्या झुकली होती. या घटनेची माहिती मिळताच जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने अग्निशमन दल व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घाव घेऊन रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर केले. सुरक्षा बॅरिकेड लावून रहदारी थांबविण्यात आली.
पोलिस अधिकारी व नगरपरिषदेच्या वतीने परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन इमारत परिसरात तत्काळ बंदी घातली. त्यानंतर सोमवारी पहाटे पुणे महानगरपालिकेचे कटर्स दाखल झाले. सकाळी आठ वाजता इमारत पाडण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच ही पाचमजली इमारत सुरक्षित पाडण्यात आली.
दरम्यान, इमारत झुकण्यामागील कारणांचा शोध तांत्रिक पथक घेत आहे. त्यामागचे नेमके कारण काय? हे तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. ही इमारत अनधिकृतपणे बांधली जात होती. त्यामुळे इमारत मालकास जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने यापूर्वीच नोटीस दिली होती. आणखी अनेक इमारती अशाच पद्धतीने बांधण्यात येत असून, त्यांनाही पालिकेने नोटिसा दिल्या आहेत. आता या इमारतींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.
जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे आणि कर्मचारी वर्गाने इमारत झुकल्यापासून ते इमारत पाडून मलबा हटविण्यापर्यंत चोख बंदोबस्त ठेवून नागरिकांची सुरक्षा केली. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाढत्या शहरांमध्ये बांधकामादरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.