

पुणे : महिलेला स्वत:च्या कारमध्ये बसवून तुझा पगार वाढवतो, प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणून महिलेसोबत अश्लील वर्तन करणा-या टिम लिडरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 38 वर्षांच्या महिलेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अनिकेत रिठे (रा. ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील एका आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी अनिकेत रिठे हे एकाच आयटी कंपनीत काम करतात. रिठे हा टिम लिडर आहे. कंपनीत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अनिकेत याने फिर्यादी यांना तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून कंपनीचे पार्किंगमध्ये स्वत:च्या कारमध्ये बसविले. तुझे प्रमोशन करतो व तुझा पगार वाढवतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणाला. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असताना त्यांचे त्यांच्याबरोबर अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख तपास करीत आहेत.