

पुणे : शहरात परवानगीशिवाय फ्लेक्स, बोर्ड किंवा बॅनर लावल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असून, त्याच्याकडून प्रतिबोर्ड १००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच, कारवाईचा खर्चदेखील संबंधितांकडून वसूल केला करण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स बॅनर व अनधिकृत जाहिरातींमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अपघातांची शक्यता वाढते तसेच शहराचे विद्रूपीकरण होते. त्यामुळे महानगरपालिकेने अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड आणि बॅनरवर आता पुणे महानगरपालिकेने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत कठोर सूचना दिल्या आहेत. परवानगीशिवाय फ्लेक्स, बोर्ड किंवा बॅनर लावल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच, संबंधित व्यक्तीकडून प्रतिबोर्ड १००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. या कारवाईचा खर्चदेखील संबंधितांकडून वसूल केला जाणार, असे आदेशही आयुक्त राम यांनी दिले आहेत.
यासोबतच महापालिकेने प्रिंटिंग प्रेस चालवणाऱ्यांना देखील सूचना दिल्या आहेत. प्रिंटिंग प्रेस चालविणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा फ्लेक्स, बोर्ड, बॅनर किंवा पत्रके छापण्यापूर्वी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य केले आहे. मशिन परवाना, साठा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्या घेऊनच व्यवसाय सुरू ठेवावा, असेही निर्देश आयुक्त राम यांनी दिले आहेत.
शहरातील कोणत्याही भागात अनधिकृत फ्लेक्स किंवा बॅनर लागणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय सहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. जर कुठे अनधिकृत फ्लेक्स आढळले, तर संबंधित सहाय्यक आयुक्तांनाच यापुढे जबाबदार धरले जाणार आहे. तसेच, पोलिस विभागाच्या माध्यमातून 'महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम, १९९५'अंतर्गत अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात प्रथापूर्वक तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.