

पुणे: राष्ट्रीय जनगणना मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन कुटुंबनोंदणीचे काम वेगाने सुरू असून, पहिल्या पाच दिवसांतच 10 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती जनगणना विभागाचे प्रमुख विजय लांडगे यांनी दिली.
यंदा राष्ट्रीय जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वगणना उपक्रम राबविला होता. या उपक्रमात जिल्ह्यातील 1 लाख 73 हजार नागरिकांनी स्वतःहून कुटुंबांची नोंदणी केली. त्यापैकी जवळपास 50 टक्के सहभाग पुणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा होता. दुसऱ्या टप्प्याला 15 मेपासून सुरुवात झाली असून, यामध्ये प्रगणकांकडून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित केली जात आहे.
या कामासाठी 12 हजार प्रगणकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक प्रगणकाला सरासरी 800 घरांपर्यंत पोहचून प्राथमिक माहिती घेणे आणि घरांना क्रमांक देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात 14 लाख मिळकती आहेत. ही जनगणना मोहीम सुरूझाली असून पहिल्या पाच दिवसांत 10 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे लांडगे यांनी सांगितले. प्रगणकांना जनगणनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.