

पुणे: कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या अपघातानंतर ससून रुग्णालयाप्रमाणेच औंध येथील जिल्हा रुग्णालयातही अल्पवयीन कारचालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा सरकार पक्षाने मंगळवारी (दि. 8) न्यायालयात केला. यावेळी, विशेष सरकारी वकील शिशिर हिरेंनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचार्यांचे जबाब असलेली कागदपत्रे न्यायालयात सादर केली. (Latest Pune News)
पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीसह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलल्याचा गुन्हा कल्याणीनगर अपघात प्रकरणात दाखल आहे. या गुन्ह्यात पुणे सत्र न्यायालयात दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया गेल्या महिन्यात सुरू केली आहे.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी खटल्याची सखोल माहिती न्यायालयासमोर मांडली. त्यावर आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. आरोप नव्याने आणि योग्य दृष्टिकोनातून तयार करावेत, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ड. सुदीप पासबोला, अॅड. ऋषिकेश गानू आणि अॅड. राजेश काळे यांनी युक्तिवाद केला.