Pune Rain| पुण्यात धरणक्षेत्रात धुवाँधार, शहरात हलका पाऊस
पुणे : शहरातील चारही धरण क्षेत्रासह घाटमाथ्यावर गत पाच दिवसांपासून सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने शहरातील नदीपात्रांना पूर आला. मात्र, फार मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या नाहीत. खडकवासला आणि वरसगाव धरणातून रविवारी (दि.२८) रात्री ७ नंतर एकूण २८ हजार ९०० क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने शहरातील नागरिकांना पूराची धडकी भरली.
रविवारी नदीपात्रात दोन वाहने वाहून गेली. काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मात्र, शहरात पावसाचा जोर कमी असल्याने सिंहगड रस्ता आणि नदीपात्राचा भाग वगळता फार मोठी हानी झाली नाही. बुधवारीही शहर आणि परिसरात पावसाचा असाच जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शहरासह चारही धरण क्षेत्रात गत पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव ही चारही धरणे रविवारी सरासरी ९१ टक्के भरल्याने जलसंपदा विभागाने मोठ्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्याचा निर्णय रविवारी रात्री घेतला. खडकवासला धऱण ८४ टक्के भरल्याने सुमारे १८ हजार ३०० तर वरसगाव धरणातून सुमारे ९ हजार ५०० क्यूसेक वेगाने एकूण २८ हजार क्यूसेक वेगाने शहरातील नदीपात्रात पाण्याचा विसर्ग येण्यास सुरुवात झाली. तसेच रविवारी रात्री १२ पासून शहरासह धरणक्षेत्रात सुरू असलेला संततधार पाऊस सोमवारी सकाळी ६ वाजता कमी झाला. मात्र, दिवसभर पाऊस सुरुच होता. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून वारंवार धरणातील विसर्गाची माहिती देणे सुरुच होते.

