

Monsoon impact on Pune air traffic
पुणे: पुण्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचा विमानतळावरून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रात्रीत होणारी पाच उड्डाणे रद्द करण्यात आली, तर पुण्यात येणाऱ्या काही विमानांना दुसरीकडे वळविण्यात आले. याशिवाय संभाव्य धोका लक्षात घेत, उडालेल्या विमानांना पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्यात आले.
सोमवारच्या (दि.15) मध्यरात्री 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंत विमान वाहतूक विस्कळीत झाली. पुण्यात मुसळधार पावसामुळे 14 उड्डाणे वळवण्यात आली होती, परंतु 3 उड्डाणे पुण्यात परतली. सोमवारी सकाळनंतर पावसाची तीवता कमी झाली आणि विमान वाहतूक पुन्हा सुरू झाली. (Latest Pune News)
दरम्यान , या वेळी भारतीय हवाई दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमान कंपन्या यांनी प्रवाशांना वेळेत सुविधा देण्यासाठी परिश्रम घेतले. या काळात प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, चहा, कॉफी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
रद्द झालेली विमाने
वडोदरा-पुणे-जोधपूर
दिल्ली-पुणे-दिल्ली
जोधपूर-पुणे
नागपूर-पुणे
चेन्नई-पुणे-चेन्नई
मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे पुणे विमानतळावर काही उड्डाणे रद्द करण्यात आली. संबंधित विमान कंपन्यांनी या विमानातील प्रवाशांना तातडीने विमाने रद्द झाल्याचे कळवले. तसेच, विमानतळावर असलेल्या काही प्रवाशांना पाऊस कमी झाल्यावर शक्य तितक्या लवकर पर्यायी विमानांमध्ये जागा उपलब्ध करून दिली. याशिवाय विमानांच्या वेळापत्रकात बदल करणे शक्य नव्हते. त्यामुळे विमान कंपन्यांनी काही प्रवाशांचे तिकिटाचे पैसे त्यांना परत केले.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ