

पुणे : पुणे ग्रॅड चॅलेंज टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची घोषणा करण्यात असून स्पर्धेचे बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण केले आहे. सायकल स्पर्धेमुळे पुण्याला जागतिक ओळख निर्माण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Latest Pune News)
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, आशियाई सायकलिंग महासंघ, यूसीआय, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यामाने पत्रकार परिषदत आयोजित केली होती. या वेळी आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजित सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, पीजीटीचे तांत्रिक संचालक पीनासी बायसेक उपस्थित होते. डुडी म्हणाले, या स्पर्धेची एकूण लांबी 437 किलोमीटर असून सुमारे 250 गावांचा या मार्गात समावेश आहे. संपूर्ण स्पर्धा चार टप्प्यांत पार पडणार असून प्रत्येक टप्पा सुमारे 100 किलोमीटर लांबीचा असेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतून ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय मान्यता 26 सप्टेंबर रोजी मिळाली असून, 5 ऑक्टोबर रोजी यूसीआय सायकलिंग कॅलेंडरमध्ये अधिकृतपणे समावेश केला आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 210 आंतरराष्ट्रीय सायकल फेडरेशनना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 25 देशांतील पथकांनी सहभागाची तयारी दर्शविली आहे. यूसीआय 2.2 या निकषानुसार अधिकाधिक 24 पथके या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक पथकात चार खेळाडू असल्यामुळे एकूण 176 खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी 28 डिसेंबर रोजी राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांना सायकलचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे, निरोगी जीवनशैलीकडे समाजाला प्रवृत्त करणे, पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करणे, तसेच विदेशी पर्यटकांना पुण्याची ओळख करून देऊन पर्यटन क्षेत्राचा विकास साधणे या उद्देशांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे डुडी यांनी या वेळी सांगितले.