

पुणे : पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही 437 किलोमीटर अंतराची आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा जानेवारी महिन्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी चांगले रस्ते तयार करण्याचे मोठे आव्हान असून, पुढील दोन महिन्यांत हे करायचे आहे. कामात कुचराई करणाऱ्या ठेकेदारावर दररोज एक लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. (Latest Pune News)
विविध देशांतून येणाऱ्या स्पर्धकांसाठी चांगले रस्ते तयार करण्यासाठी पुणे मनपाला 125 कोटी रुपये, पिंपरी-चिंचवड मनपाला 70 कोटी रुपये, पीएमआरडीएला 190 कोटी रुपये, तर सार्वजनिक बांधकाम विभागाला 76 कोटी रुपये लागणार आहेत. या संस्थाच त्यांच्या हद्दीतील कामाचा खर्च करतील. 10 डिसेंबरपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले आहे.
कमी कालावधीत काम पूर्ण करावयाचे असल्याने रोजच्या कामाचे लक्ष्य निश्चित केले जाणार आहे. ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांना दररोज एक लाख रुपये दंड ठोठावला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
स्पर्धेचा लोगो आणि जर्सीचे अधिकृत अनावरण एक नोव्हेंबरला होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेला युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) या संघटनेने मान्यता दिली आहे.
यूसीआयने स्पर्धेचा मार्ग 629 किलोमीटरवरून कमी करून 437 किलोमीटर करण्याचे ठरविले आहे.
यूसीआयने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून, तेरा देशांतील सायकल संघटनांनी नोंदणी केली आहे. किमान दोनशे परदेशी स्पर्धक सहभागी होतील, अशी अपेक्षा डुडी यांनी व्यक्त केली.