

पुणे: अमेरिका-इस्रायल आणि इराण यामधील युद्धाची वाढलेली तीवता आणि कच्च्या तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमती यामुळे जागतिक अस्थिरता वाढली आहे. त्यामुळे, सोन्या-चांदीच्या दरांतील चढ-उतार सुरूच आहे. पुण्यातील सराफा बाजारात मंगळवारी (दि. 10) सोने तोळ्यामागे 1 हजार 700 रुपये, तर चांदी किलोमागे 13 हजारांनी महागली. परिणामी, जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळ्याचा दर 1 लाख 64 हजार रुपये, तर चांदीचा किलोचा दर 2 लाख 81 हजार रुपये इतका राहिला.
याबाबत सराफा व्यावसायिक जीत मेहता म्हणाले, इराण आणि अमेरिकेमधील तणाव आणखी वाढला किंवा कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या, तर सोने-चांदीमध्ये पुन्हा तेजी येऊ शकते. याखेरीज, अमेरिकेचे आर्थिक आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आले तर डॉलर मजबूत होईल आणि यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढू शकतो. सध्या तरी दरात कोणतीही मोठी दरघट अथवा वाढ नाही.
पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सोने परवडणारे होते. त्यानंतर ते त्यांच्या आवाक्याबाहेर गेले त्यापाठोपाठ दीड लाखपार सोने गेल्याने ते मध्यवर्गीयांना परवडेनासे झाले आहे. येत्या काळात परिस्थिती पूर्ववत न झाल्यास सोने अंदाज बांधता येणार नसल्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे.