Pune Ganeshotsav DJ Controversy: विद्यानंद बापटांना मारहाण; पुण्याची ‘उज्ज्वल परंपरा’ नेमकी कुणासाठी?

उलट त्या 'उदात्त', 'अभिमानजनक' परंपरेचं अचूक पालनच ही घटना घडवणाऱ्यांनी केलं...
Pune Ganeshotsav DJ Controversy
Pune Ganeshotsav DJ ControversyPudhari
Published on
Updated on

- सुनील माळी

पुण्याच्या गणेशोत्सवातल्या कर्णकटु डीजेनं सामान्य पुणेकरांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात एकांडेपणानं लढाई सुरू करणाऱ्या, निधड्या छातीनं रोखठोक बोलणाऱ्या विद्यानंद बापट नामे शिलेदाराला मारहाण झाली या घटनेनं पुण्याची 'उज्ज्वल', 'दिमाखदार' वगैरे वगैरे परंपरा अजिबात मोडली गेली नाही. उलट त्या 'उदात्त', 'अभिमानजनक' परंपरेचं अचूक पालनच ही घटना घडवणाऱ्यांनी केलं...

... ही तर पुण्याची देदीप्यमान अशी परंपराच आहे. समाजाविषयी कळकळ वाटणाऱ्या, त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात, त्यांचा भौतिक-सामाजिक-बौद्धिक विकास व्हावा यांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या समाजधुरिणांना शत्रू मानणं आणि त्यांच्यावर खुनी हल्ले चढवणं, ते न जमलं तर त्यांचा छळ करणं ही पुण्याची परंपराच आहे.

... दीनदलितांना माणूस म्हणून ओळखलं जावं, यासाठी आयुष्य घालवलेल्या जोतिरावांवर परंपरांचे ढोल बडवले जाणाऱ्या याच पुण्यात पुणेकरांनी एका काळरात्री खुनी हल्ला केला. केवळ जोतिरावांच्या अथांग व्यक्तिमत्त्वाच्या दर्शनानं थरारल्यानं त्यांनी आपली शस्त्रं म्यान केली, पण त्या हातामागील मेंदू कुटिल पुणेरीच होता.

... आमच्या मुलींना शिकवते ? अन धर्म बुडवते ? असं विचारत सावित्रीबाईंच्या अंगावर शेणसडा टाकणाऱ्या आपल्या भगिनीही पुण्याची हीच उदात्त परंपरा पुढे नेण्यासाठी सरसावल्या.

... प्रसंगी जीवही घेणाऱ्या अनेको घातक अंधश्रद्धांनी समाजाचं होणारं शोषण थांबावं, या कळकळीनं झोकून देऊन चळवळ उभी करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा याच परंपरानिष्ठांनी बळी घेतला...

Pune Ganeshotsav DJ Controversy
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाला ब्रेक; पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता

... गणेशोत्सवातील मांडवांचा आकार वाहतुकीला अडथळा आणणारा असता कामा नये, या उद्देशानं नव्वदीच्या दशकात पत्रकारितेचे हत्यार वापरणाऱ्या प्रकाश कर्दळे या ज्येष्ठ पत्रकाराला एका अस्सल पुणेकरानंच काळं फासून पुण्याची हीच परंपरा मोठ्या निष्ठेनं पुढं नेली...

... अन् आता काल निर्भीडपणानं आपली मतं मांडून, बाबासाहेबांनी केलेल्या राज्य घटनेनं दिलेलं स्वातंत्र्य मागणारा विद्यानंद बापट हा तरूण टीव्ही चँनेलला मुलाखत देत असतानाच त्याला सणसणीतपणानं फटकावण्यात आलं आणि आपली ही 'मोठी परंपरा' पुणेकरांनी राखली.

पुणं हे विद्येचं माहेरघर आहे, पुणेकर सुशिक्षित आहेत, देशातल्या इतर मागास शहरांपेक्षा पुण्यातला गुन्हेगारीचा दर खूपच कमी आहे, इथं कायद्याचं राज्य आहे... या वल्गना केल्या जातात खऱ्या, पण प्रत्यक्षात पुण्याची परंपरा (हा शब्द जेव्हाजेव्हा येईल तेव्हातेव्हा न विसरता त्याच्या अलिकडे उज्ज्वल शब्द आहे, हे गृहीत धरावं.) ही परंपरा मोडणाऱ्यांनाच मोडण्याची आहे.

भले या परंपरा घातक असतील, भले त्या पुणेकरांचं शोषण करणाऱ्या असतील, भले त्या कालबाह्य झालेल्या आणि अर्थहीन ठरलेल्या असतील, परंपरा या परंपराच आहेत आणि त्या मोडणाऱ्या नव्हे तर मोडण्याची साधी भाषा करणाऱ्यांचाही परंपरानिष्ठ पुणेकरांना भलताच राग येतो.

आम्हाला कुणी मेंढरं म्हटलं तरी मग आम्ही त्याकडं दुर्लक्ष करतो. समुद्र ओलांडून परदेशात जाऊन परत आलेल्या लोकमान्यांनी समुद्र न ओलांडण्याचा परंपरागत नियम मोडला म्हणून चक्क त्यांनाच काशी विश्वनाथाच्या दर्शनाचं प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. पाव-बिस्किटं खाल्ली म्हणूनही परंपरानिष्ठ पुणेकर खवळले होते...

... मग इतकी जाज्ज्वल्य परंपरा असलेल्या या पुण्यात हा कोण कुठला विद्यानंद बापट साताठ वर्षांपूर्वी येतो ?, पुणेकरांना आमच्या एकशेबत्तीस वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवात काळानुरूप बदल करायच्या गोष्टी कसा करतो ?... त्याला थोबडायचे नाही तर काय ?... काय तर म्हणे मिरवणुकीतल्या डीजे-प्लाझ्मा-प्रेशर मींड-टु टॉप, टु स्पीकर, फोर टॉप, फोर स्पीकर आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या ध्वनियंत्रणा कर्णकर्कश्य आहेत... असू देत ना.

Pune Ganeshotsav DJ Controversy
Baramati Politics: सत्तेत असताना तुम्ही काय करत आहात? मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचा विखेंना सवाल

आमची गणेशोत्सवाची मिरवणूक वर्षातून फक्त एकदाच असते. तेच दोन दिवस आम्ही दणाणून सोडतो. मिरवणुकीतल्या आमच्या ध्वनिप्रदूषणानं कान खलास होतील ते आमच्या कार्यकर्त्यांचेच ना ? ते स्वतःहून, राजीखुशीनं मिरवणुकीत आले असल्यानं त्यांच्या कानांचं भलं-बुरं ते पाहून घेतील.

आता सामान्य पुणेकरांना या आवाजाचा त्रास होत असेल तर त्यांनी मिरवणुकीत येऊ नये, ते दोन दिवस त्यांनी पुण्यातून बाहेर जावं. त्यावर ते बापट म्हणतात 'आम्ही केवळ गणेशोत्सव करून थांबत नाही तर वर्षभर आमचे उत्सव चालतात आणि आम्ही ध्वनिप्रदूषण करतो. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचा त्रास न होणं, रस्त्यावर अडथळ्याविना वाहतूक झाली पाहिजे, हा आम्हाला राज्य घटनेनं दिलेला हक्क आहे.'

... या बापटांची हिंमत कशी झाली असं बोलायची ? राज्य घटनेनंच आम्हाला उपासना स्वातंत्र्य दिलं आहे. त्यानुसार आम्ही वर्षानुवर्षे स्पीकरच्या भिंती उभारून तीस-तीस तास मिरवणुका रंगवल्या नव्हे दणाणल्या, पण आमच्या शांततेवर घाला घातला जातोय, म्हणून अन त्याच राज्य घटनेचा हवाला देत कोण कुठल्या नतद्रष्टानं वरच्या कोर्टात अर्ज केला अन तेव्हापासून रात्री दहाला उत्सवातला आमच्या स्पीकरचा आवाज बंद करावा लागतोय.

उत्सवात रात्री दहाला स्पीकर बंद झाल्यानं ज्येष्ठांना झोप मिळू लागलीये अन हॉस्पिटलातल्या रूग्णांचे हालही थांबलेत, असंही म्हटलं जातय. अहो, एवढी दिमाखदार परंपरा सांभाळण्यासाठी पुणेकरांनी दहा दिवसांचा त्याग करायला नको का ? आता 'सरसकट सर्वच उत्सवातल्या या स्पीकरच्या भिंती बंद करा', असं हा बापट म्हणतोय. किती भयंकर मागणी आहे ही ? अहो, मजाच निघून जाईल ना त्यामुळं उत्सवातली.

... पुणे या विद्येच्या माहेरघरात सध्या नाव ऐकू येतंय ते फक्त विद्यानंदाचंच. त्या कसबा गणपतीसमोर एका वाहिनीच्या रंगलेल्या चर्चेत या विद्यानंद बापटावर मंडळांच्या मंडळींनी सडकून टीका केली, 'याला काळं कुत्रंही ओळखत नाही पुण्यात' अशी त्याची हेटाळणीही झाली... पण पुढं झालं भलतंच.

त्या चर्चेचा पॉडकास्ट युट्युबवर आला, तो चार लाख पुणेकरांनी पाहिला, अकराशे कॉमेंट्स आल्या... त्या कॉमेंट्सपैकी ९९ टक्के कॉमेंट्स बापटाच्या बाजूच्या की हो निघाल्या.

आम्ही म्हणत होतो तुम्ही चँनेलवाल्यांनी त्याला उगाचच प्रसिद्धी देऊन मोठा केलाय, पण सामान्य पुणेकरांनीच त्याला हिरो केला की हो... 'एकटा माणूस मनात आणलं तर काय करू शकतो ?, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे...' 'डीजे वाजवणारे खरे नास्तिक, दुसऱ्याचा छळ करणारे विकृत आहेत...', 'बापट आणि मुंडेसाहेब, भारी एकदम...', 'बापट यांना फूल सपोर्ट...', 'उत्सव सुरू झाला तेव्हा डीजे होते का ? मग डीजे परंपरेचा भाग कसा झाला ?...', 'झुंडशाहीसमोर तुम्ही धाडस दाखवले...', 'एक बापट और बाकी सब के मुंह पें चापट...', 'आज टिळक असते तर उत्सवाचं बीभत्स रूप पाहून ते हिमालयात गेले असते...', 'सूर्य पृथ्वीभोवती नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगितल्यानंतर समाजानं गँलिलिओला तुरूंगात टाकलं, पण नंतर तेच खरं ठरलं तसंच बापटसाहेब, तुमचं म्हणणं एक दिवस हेच लोक मान्य करतील...' अशा कॉमेंटमागून कॉमेंट बापटच्या कौतुकाच्याच होत्या. पत्रकार म्हणू लागले, 'जनमत कुठं आहे ? ते आता मंडळांना अन राजकारण्यांना कळू लागलंय...' पण सांगू का ?, या सामान्य पुणेकरांना काहीच कळत नाही. चांगला उत्सव दणक्यात एँजॉय करायचा तर लागले हे पण त्या बापटाच्या मागं...

... सामान्य माणसं त्या बापटाच्या मागं, मीडियावाले त्याच्या मागं अन उत्सवाचं स्वरूप बदला म्हणत हा चाललायं पुढं... अशानं आमची 'भव्य-दिव्य', 'उदात्त' परंपरा खंडित होणार की नाही ? आमच्या परंपरेला जो धक्का लावेल, त्याला धक्क्याला लावण्याची आमची परंपरा आहे. पाहा चाळुनी पाने पुण्याच्या इतिहासाची... तीच आज पाळली गेली..., याचा आम्हाला अभिमान आहे... (असंच मत सुज्ञ पुणेकरांचं असेल तर बुद्धिदेवता श्री गणेश त्यांचं भलं करो...)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news