पुणे: प्रामुख्याने शहराच्या एकाच भागात केंद्रित झालेला गणेशोत्सव पूर्व भागासह सर्वदूर उपनगरांपर्यंत रसरशीतपणे साजरा व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार गणेशोत्सव मंडळांनी शनिवारी व्यक्त केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दैनिक ’पुढारी’च्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहराच्या कानाकोपर्यांसह उपनगरांतूनही मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांनी उपस्थिती लावत आपली मते मांडली.
श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती-कोथरूडच्या सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. हा उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावा, यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि आवश्यक सुविधांचा समावेश होता. (Latest Pune News)
जत्रा, यात्रा आणि उत्सव हे समाजाला एकत्र आणण्यासाठी असतात. त्यामुळे प्रत्येकाने उत्सव म्हणून एकत्र येण्याची आवश्यकता आहे. पौराणिक व सामाजिक देखाव्यांमधून नवीन बोध होईल, असे देखावे साकारण्याची आवश्यकता आहे. शहरातील प्रत्येकापर्यंत नाट्य पोहचविण्याचे माध्यम म्हणजे जिवंत देखावे आहेत.
त्यामुळे गणेशोत्सवातील जिवंत देखाव्यांना रंगभूमी म्हणून मान्यता द्यावी. गणेशोत्सवाला राजाश्रय मिळण्यास 132 वर्षे लागली. मात्र, गणेश मंडळांच्या समस्या अद्याप कायम आहेत. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. त्याअनुषंगाने निर्बंधमुक्त गणेशोत्सव होण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
उत्सव म्हटल्यावर थोडे फार गालबोट लागणारच. मात्र, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विसर्जनाच्या एक दिवसाचा विचार न करता उर्वरित 364 दिवसांकडे पाहणे गरजेचे आहे, तरच खर्या अर्थाने आपले जीवन गणेशभक्त म्हणून
सार्थकी लागणार आहे. मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते बंद केल्याने पूर्व भागात देखावे पाहण्यासाठी येणार्या भाविकांना येणार्या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले. ऐतिहासिक घटनांवर देखावे सादर करताना पोलिस यंत्रणांकडून अडवणूक करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. ते थांबण्याची गरज आहे. शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मंडळांच्या भेटीसाठी येणार असतील तर त्यांना चारपूर्वी येण्याची विनंती करावी. जेणेकरून वाहनकोंडी होऊन गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही.
टिळक रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज
शिवाजी रस्ता व बाजीराव रस्त्यावर बॅरिकेटींग लावून दोन्ही रस्ते बंद करू नयेत, अशी मागणी करण्यात आली. याखेरीज, लक्ष्मी रस्त्याप्रमाणेच टिळक रस्ताही प्रमुख विसर्जन मार्ग आहे. त्याकडे, महापालिका व पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत मंडळांनी व्यक्त केली.
या ठिकाणीही प्रशासनाने नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. गणेशोत्सवात फक्त विसर्जनाच्या दिवशीची चर्चा न होता दहा दिवसांत सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत सर्वांनी विचार करावा. विसर्जन मिरवणुकीत डीजे लावणारी मंडळे सामाजिक उपक्रम राबवित नाही अथवा देखावे सादर करत नाही ही धारणा चुकीची आहे. ढोल असो की डीजे प्रत्येकाबाबत दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता असल्याचा सूरही या वेळी उमटला.
गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधींच्या अपेक्षा...
महापालिका अधिकार्यांनी या उत्सवात सहभागी होत गणेश मंडळांना सहकार्य करावे.
देखावे पाहण्यासाठी पूर्व भागात जाणार्या भाविकांना पोलिसांच्या बॅरिकेडचे अडथळे येतात, त्यामुळे पूर्व भागात जाणार्या भाविकांची गर्दी दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे पोलिसांनी पूर्व भागात जाणारे रस्ते गणेशोत्सव काळात बंद करू नयेत.
दरवर्षी लक्ष्मी रोडला पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असतो. टिळक रस्त्यावर देखील पोलिसांचा बंदोबस्त असावा.
टिळक रस्त्यावरील मंडळांना दुय्यम वागणूक न देता त्यांना मानाची वागणूक मिळावी. त्यांना पालिकेचा मानाचा नारळ मिळावा.
गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस दारूबंदी करावी.
मिरवणुकीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टिळक रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन करावे.
टिळक रस्त्यावरील गणेश मंडळांना लकडी पुलावर परवानगी मिळावी.
यंदा ग्रहण आहे, त्यामुळे मिरवणूक लांबू नये, याकरिता ठोस उपाययोजना कराव्यात.
वर्षभर सामाजिक कामे करणार्या मंडळांना बक्षीस द्यावे.
मिरवणूक म्हणजे गणेशोत्सव नाही, गणेशोत्सवाचे पावित्र्य जपून दहा दिवस गणेशोत्सव साजरा करा.
गणेशोत्सवात डीजेमुक्तीसह व्यसनमुक्तीवरही भर द्यावा.
केळकर रोडला पोलिस बंदोबस्त नसतो, भाविक आणि मंडळांचे कार्यकर्ते मिरवणुकीच्या दिवशी या रस्त्यावर एकत्र येतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त केळकर रोडलाही असावा.
मिरवणुकीचा वेळ कमी करण्यासाठी पोलिसांनी यंदा ठोस उपाययोजना कराव्यात.
पौराणिक देखाव्यांना रात्री 10 च्या वेळेचा निर्बंध शिथिल करावा.