Pune Ganesh Visarjan noise level 2025
पुणे: आवाज वाढव... डीजेच्या भिंती, ढोल-ताशांचा दणदणाट यांसह अन्य वाद्यांमुळे लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मार्गावरील दहा चौकांतील आवाजाची पातळी 2022 आणि 2023 मध्ये शंभर डेसिबलच्या पुढे होती. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून ध्वनिप्रदूषणाची पातळी काही प्रमाणात घसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्यावर्षी 94.8 तर यंदा 92.6 डेसिबल ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2.2 डेसिबलने ध्वनिप्रदूषणाची पातळी घसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी नोंदवली गेलेली ध्वनिपातळी आरोग्यासाठी हानिकारकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
कोरोना संपल्यानंतर सन 2022 पासून पुन्हा एकदा जल्लोषात गणेश विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. त्यामुळे ढोल-ताशा, डीजे यांच्यासह विविध वाद्यांच्या आवाजाला सीमाच उरलेली नाही. त्याचा परिणाम म्हणजे मिरवणुकीत सहभागी आणि आजूबाजूच्या लोकांना आवाजाचा दणका सहन करावा लागत आहे.
दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाने किती स्पीकर वापरायचे, पथकातील ढोल-ताशांची संख्या किती ठेवायची, याबद्दल पोलिस, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकांच्या बैठका होऊन त्यात निर्णय होतो. मिरवणुकीचा वेळ कमी करण्यासाठी आणि ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नियमावली जाहीर केली जाते. परंतु, यंदाचे ध्वनिप्रदूषण पाहता या बैठकांचा फारसा परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सरासरी 92.6 डेसिबल ध्वनिपातळी होती. परंतु, 6 सप्टेंबरला बेलबाग चौकात रात्री आठ वाजता 105.6 तर लिंबराज चौकात 105.1 डेसिबल तर 7 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता कुंटे चौकात 111.8 डेसिबल तर खंडोजीबाबा चौकात 109 डेसिबल या सर्वाधिक नोंद झाली आहे.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविज्ञान विभागातर्फे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणाची मोजणी करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे रौप्यमहोत्सवी अर्थात 25 वे वर्ष होते. सीओईपीच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन मोहित कांडलकर आणि श्रेया कारंडे यांनी केले.
मृणाल खुटेमाटे, सुमेध ब्राम्हणकर, आर्या घाडगे, अदिती तळोकार, श्रावणी शिंदे, क्रिश खोलिया, अथर्व रांखोडे, प्रथमेश पोधाडे, ओम सोनवणे, शंतनु केले, संचिता पाटील, ओम बेहरे, साहिल अग्रवाल, भूमिका अवचट, अदित्य संजीवी, कार्तकि गायखे, सुयोग सावंत, आदर्श चौधरी, उत्कर्षा काकड, अस्मिता गोगटे, स्वराली आवळकर, सिद्धार्थ शिडीद, वेदांत जोशी, मेहेर रघाटाटे यांनी आकडेवारीचे विश्लेषण केले.
शनिवारी (दि. 6) दुपारी बारा ते रविवारी (दि.7) सकाळी आठ या वेळेत लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख चौकांत ध्वनिपातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार शनिवारी दुपारी बारा वाजता सरासरी 88.5 डेसिबल, सायंकाळी चार वाजता सरासरी 84.9 डेसिबल रात्री आठ वाजता 98.7 डेसिबल, मध्यरात्री 91.4 डेसिबल, पहाटे चार वाजता 91.1 डेसिबल, सकाळी आठ वाजता 101 डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.
केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निकषांनुसार दिवसा निवासी क्षेत्रात 55 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 75 डेसिबल, व्यापारी क्षेत्रात 65 डेसिबल तर शांतता क्षेत्रात 50 डेसिबल तर रात्रीच्या वेळी निवासी क्षेत्रात 45 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 70 डेसिबल व्यापारी क्षेत्रात 55 डेसिबल तर शांतता क्षेत्रात 40 डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे.